हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत विंडीजने खराब सुरुवातीनंतर गोलंदाज शेनॉन गॅब्रियलच्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात पुन्हा रंगत आणली. दिवसभराचा खेळ संपला तेंव्हा न्यूझीलंडच्या सात बाद २८६ धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडने शानदार सुरुवात करत दोन बाद १५४ धावा केल्या. मात्र त्यानंतर लागोपाठ बळी गेल्यामुळे त्यांची अवस्था पाच बाद १८९ धावा अशी झाली. पहिल्या कसोटीत शतक झळकावलेल्या कोलिन डी ग्रॅँडहोमे (५८), तर मिशेल सॅँटेनर (२४ ) यांनी ७६ धावांची भागीदारी केली. गॅब्रियलने दोघांनाही त्रिफळाचित करत न्यूझीलंडला धक्का दिला.
तत्पूर्वी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी निराशा केली. जीव रावल (८४ ) व टॉम लॅथम (२२) यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावा केल्या. रावल बाद झाल्यानंतर केन विल्यम्सन याने ४३ धावा करत चांगली सुरुवात केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना लय सापडल्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळला. त्यानंतर अवघ्या ७४ धावांत पाच गडी बाद झाले. दिवसअखेर टॉम ब्लंडल १२ तर नील वॅगनर एक धावेवर खेळत होते. (वृत्तसंस्था)