Join us  

एनसीएत ‘तंदुरुस्ती चाचणी’ अनिवार्यच

सौरव गांगुली : तंदुरुस्तीबाबत कोणत्याही खेळाडूसोबत तडजोड होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 4:27 AM

Open in App

कोलकाता : ‘जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची चाचणी राष्टÑीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) होईल,’ असे सांगून ‘तंदुरुस्ती चाचणीबाबत प्रत्येक खेळाडूला एनसीएच्या प्रक्रियेतूनच जावे लागेल,’असेही भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआय) सौरव गांगुली यांनी म्हटले.जसप्रीत बुमराह आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविड हे दोघेही तंदुरुस्ती चाचणी बेंगळुरुमध्ये करण्यास इच्छूक नाहीत, असे आधी सांगण्यात येत होते. बुमराहच्या पाठीत दुखणे उमळले होते. त्याने विशाखापट्टणम येथे विंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघासह नेटमध्ये गोलंदाजी सराव केला होता.याविषयी विचारातच गांगुली म्हणाले, ‘मला याची माहिती नाही. मात्र तंदुरुस्तीबाबत तडजोड होणार नाही. प्रत्येक खेळाडूला एनसीएत तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करावेच लागेल. खेळाडूंच्या प्रवासाची व्यवस्था बीसीसीआय करेल.’ बुमराह एनसीएत तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करण्यास इच्छूक नाही, अशा आशयाचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारताच गांगुलीने वरील स्पष्टीकरण दिले.जसप्रीत बुमराहने दुखापतीतून सावरल्यानंतर एनसीएमध्ये सराव करण्याऐवजी खासगी ट्रेनरच्या देखरेखीखाली सरावाचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एनसीए प्रमुख आणि माजी कर्णधार राहुल द्रविड नाराज झाल्याचे समजते. २६ वर्षांच्या बुमराहने पाठदुखीतून सावरताच आयपीएल फ्रेंचाईजी दिल्ली कॅपिटल्स संघाचे ट्रेनर रजनीकांत शिवागनानम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या बीकेसी मैदानावर सराव सुरू केला. यानंतर त्याने भारतीय संघाच्या सराव सत्रातही सहभाग घेतला होता. (वृत्तसंस्था)एनसीए आंतरराष्टÑीय क्रिकेटपटूंसाठी पहिले आणि अखेरचे केंद्र असेल, असा दावा करीत गांगुली पुढे म्हणाले,‘हे केंद्र भारतीय क्रिकेटपटूंसाठी असून प्रत्येकाला एनसीएत जावेच लागेल. आमचे खेळाडू वर्षभर प्रत्येक ठिकाणी खेळतात. एनसीएतील फिजिओ मुंबईत बुमराहच्या मदतीसाठी येऊ शकतात की नाही, यासंदर्भात प्रयत्न केले जातील. एनसीएत सर्वोत्कृष्ट लोकांची उपस्थिती राहील, याची खबरदारी घेण्यात येईल.’ गांगुली यांनी अलिकडे एनसीएचा दौरा केला होता. यादरम्यान जुलैमध्ये एनसीए प्रमुख बनलेले राहुल द्रविड यांच्यासोबत चर्चा केली होती.गांगुली यांनी आयपीएल लिलावावर देखील भाष्य केले. ते म्हणाले,‘ केकेआरने आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला १५.५० कोटीत खरेदी केले असले तरी ही किंमत फार मोठी असल्याचे मला वाटत नाही. हे गरजेनुसार घडते. बेन स्टोक्सलाही त्यावेळी १४.५० कोटी मिळाले होते.’ गांगुलीने स्वत:च्या पसंतीचा संघही निवडला असून या संघाचे कर्णधारपद आणि प्रशिक्षकपद स्वत:कडे ठेवले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांना संघात स्थान दिले असून यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतला निवडले आहे.