साऊथम्पटन : जॉनी बेयरस्टॉ याच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडीजवर पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ९ गडी राखून पराभूत के ले. त्याचबरोबर ही मालिका ४-० अशी जिंकली.
बेयरस्टॉने नाबाद १४१ धावा केल्या. त्याच्या बळावर इंग्लंडने १२ षटके बाकी ठेवून ३८ षटकांत १ बाद २९४ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला. बेयरस्टॉशिवाय ४ धावांमुळे शतकापासून वंचित राहिलेल्य जेसन राय याने ९६ धावा केल्या. तो मिगुएल कमिन्सच्या चेंडूवर पायचीत झाला. बेयरस्टॉने ९० चेंडूंत १० चौकारांसह शतक पूर्ण केले. जो रूटने नाबाद ४६ धावा करून बेयरस्टॉसह संघाला विजयी केले.
तत्पूर्वी वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २८८ धावा केल्या. त्यांच्याकडून शाइ होपने ७२, ख्रिस गेलने ४० धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून लियम प्लंकेटने (२/५४) व मोईन अलीने (१/३६) चांगला मारा केला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज : ५० षटकांत ६ बाद २८८. (शाइ होप ७२, ख्रिस गेल ४०. लियाम प्लंकेट २/५४, मोईन अली १/३६). पराभूत वि. इंग्लंड ३८ षटकांत १ बाद २९४. (जॉनी बेयरस्टॉ नाबाद १४१, जेसन राय ९६, जो रूट नाबाद ४६. मिगुएल कमिन्स १/७०).