इंदूर : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघाची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी साधारण असल्याचे सांगताना इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा-या अॅशेस मालिकेपूर्वी कुठल्याही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये काही सामने जिंकण्यात उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
होळकर स्टेडियममध्ये तिसºया लढतीत चांगल्या सुरुवातीनंतरही आॅस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्मिथने अखेरच्या १२ षटकांतील फलंदाजी पराभवास कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथ म्हणाला, ‘येथे मालिका गमाविणे अॅशेससाठी चिंतेचा विषय नाही. कारण ते वेगळ्या स्वरूपाचे क्रिकेट आहे, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला प्रत्येक स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये काही सामने जिंकायला नक्कीच आवडेल. आम्हाला अपेक्षित निकाल देता आलेले नाही. त्यात बदल घडविणे आवश्यक आहे. पराभवानंतर वाईट वाटते. मालिकेत आमची स्थिती ०-३ असल्यामुळे अधिकच वाईट वाटते.’ (वृत्तसंस्था)
स्मिथ म्हणाला,‘फलंदाजी करताना पहिली ३८ षटके आमच्यासाठी चांगली होती. आम्हाला अशा प्रकारची सुरुवात आवश्यक होती. आघाडीच्या दोन फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर एकाने (अॅरोन फिंच) शतक झळकावले. आम्ही जर ३३०-३४० धावा फटकावण्यात यशस्वी ठरलो असतो तर निश्चितच निकाल वेगळा लागला असता. माझ्या मते आमचे काही फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले. याव्यतिरिक्त त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली मारा केला. भुवनेश्वर व बुमराह सध्याच्या स्थिती डेथ ओव्हर्समधील सर्वोत्तम गोलंदाज आहेत.’