- सौरव गांगुली लिहितात...
भारतीय संघाने इंदूरचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे आॅस्ट्रेलिया संघ भारताला रोखण्यासाठी डोके खाजवत आहे. भारतीय फलंदाजी अद्याप बहरली नसली तरी आॅस्ट्रेलियाला रोखण्याइतपत पुरेशी ठरली. इंदूरची विकेट ‘बॅटिंग फ्रेन्डली’ मानली जाते. त्यामुळे दोन्ही संघ आधी फलंदाजी घेण्यासाठी आतुर दिसतात.
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यास आधी फलंदाजी करीत सामना जिंकण्यासाठी काय करायला हवे, यावर डावपेच आखत आहेत. चेन्नईची खेळपट्टी वळण घेणारी होती आणि त्यात पावसाने रोमहर्षकता वाढली. ईडनची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होती. पण तेथे फिरकीला बळी ठरलेला आॅस्ट्रेलियाचा संघ पराभवामुळे अडचणीत आला. वॉर्नर आणि स्मिथ बाद झाल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळते असे निदर्शनास आले. अशा स्थितीत आधी फलंदाजी करायची आणि बचावाची जबाबदारी गोलंदाजांवर टाकायचा विचार संघ व्यवस्थापन करीत आहे. पॅट कमिन्स आणि नाथन कोल्टर नाईल यांचा अपवाद वगळता पाहुण्या गोलंदाजांना अद्याप फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. ईडनवर भारताकडून विराटची बॅट तळपली. अशा प्रकारची फटकेबाजी तो कुठल्याही मैदानावर करू शकतो. त्याची आक्रमकता आणि गोलंदाजांवर तुटून पडण्याची वृत्ती अनाकलनीय आहे.
भारतीय कर्णधाराच्या वृत्तीपासून युवा खेळाडू प्रेरणा घेऊ शकतात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर माझ्या मते निवडकर्ते चेंडूला वळण देणाºया फिरकीपटूंच्या शोधात होते. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने दोन युवा गोलंदाजांचा शोध लागला. कुलदीपच्या चेंडूत विविधता आहे तर चहल हा वेगळ्याच धाटणीचा गोलंदाज आहे. त्याचा मैदानावरील वावर भारतीय संघाची ताकद ठरावी.
आॅस्ट्रेलियाचे फलंदाज यजुवेंद्रचे चेंडू समजूच शकले नाहीत. या दोघांचे यश पाहुण्या संघासाठी डोेकेदुखी ठरत असल्याने उर्वरित सामन्यांमध्ये विजय कसे मिळवायचे, या विचारात स्मिथ अॅण्ड कंपनी व्यस्त दिसते.
(गेमप्लान)