Join us  

हॅट्ट्रीकमागे धोनी मॅजिक..., भारताच्या विजयात मोलाचे योगदान

आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने हॅट्ट्रिक घेतली. एकदिवसीय सामन्यात असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. या भन्नाट कामगिरीच्या जोरावर भारताने दुस-या सामन्यात आॅस्ट्रेलियाला ५० धावांनी पराभूत केले. ईडन गार्डनवर प्रत्येक चेंडूवर मार्गदर्शन करणा-या महेंद्रसिंग धोनीचा कुलदीपच्या हॅट्ट्रिकमध्ये मोलाचा वाटा राहिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:51 AM

Open in App

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने हॅट्ट्रिक घेतली. एकदिवसीय सामन्यात असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. या भन्नाट कामगिरीच्या जोरावर भारताने दुस-या सामन्यात आॅस्ट्रेलियाला ५० धावांनी पराभूत केले. ईडन गार्डनवर प्रत्येक चेंडूवर मार्गदर्शन करणा-या महेंद्रसिंग धोनीचा कुलदीपच्या हॅट्ट्रिकमध्ये मोलाचा वाटा राहिला.सामन्यानंतर खुद्द कुलदीपने धोनीला याचे श्रेय देत त्याचे आभारही मानले. कुलदीपने मॅथ्यू वेडला पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने वेडची दांडी गूल केली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात आलेल्या अ‍ॅश्टन एगरला पायचित करताच कुलदीप हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचला. लागोपाठ दोन गडी बाद करताचा मैदानावर उपस्थित चाहते हॅट्ट्रिक पाहण्यासाठी आतुर झाले होते. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करून नवा इतिहास रचण्यासाठी कुलदीपने धोनीचा सल्ला घेणे महत्त्वाचे मानले. तिसरा बळी मिळवण्यासाठी कसा चेंडू टाकायला हवा, याबाबत त्याने सल्लामसलत केली. धोनीने त्याला अमूल्य सल्ला दिला, शिवाय पॅट कमिन्सचा सुरेख झेल पकडून हॅट्ट्रिकला हातभारही लावला.कुलदीप म्हणाला, ‘हॅट्ट्रिक साधण्याचे स्वप्न मी कधीच पाहिले नव्हते. पहिल्या सामन्यात मला खूप संघर्ष करावा लागला. मॅक्सवेलने लगावलेल्या सलग तीन षटकारामुळे खूप काही शिकवले. हॅट्ट्रिकचा चेंडू टाकण्यापूर्वी धोनीने तुला योग्य वाटेल तसाच मारा कर, असा सल्ला दिला.’ (वृत्तसंस्था)>दिग्गजांनी केले कुलदीपचे कौतुकसचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी हॅट्ट्रिकवीर ‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादव याचे तोंडभरून कौतुक केले.‘कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी केवळ चांगली गोलंदाजी केली नाही तर सामनादेखील फिरविला,’ या शब्दात सचिनने टिष्ट्वट केले. विराट आणि अजिंक्यच्या खेळीचीही सचिनने प्रशंसा केली.गांगुली म्हणाला,‘कुलदीपने विशेष गोलंदाजी केली. त्याला दीर्घ वाटचाल करायची आहे. संघासाठी तो अनमोल खेळाडू ठरावा, यासाठी माझ्या शुभेच्छा.’हरभजन आणि कुलदीपच्या हॅट्ट्रिकची तुलना कशी करशील असे विचारताच गांगुली पुढे म्हणाला,‘तुलना होऊच शकत नाही. हॅट्ट्रिक नोंदविणे सोपी बाब नाही.’ कुलदीपचा आयपीएलमधील कर्णधार गौतम गंभीर म्हणाला,‘कुलदीपच्या टी शर्टचा रंग बदलला असेल पण गोलंदाजीतील आक्रमकता कायम होती.’