Join us  

कर्णधार बदलला, पण निकालाचे काय?

पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये मॉर्गन कर्णधार म्हणून उत्कृष्ट आहे. पण त्याआधी कार्तिकच्या निर्णयाचा आपल्याला विचार करावा लागेल. याबाबत अनेक गोष्टी कानावर आल्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 8:51 AM

Open in App

अयाझ मेमनआयपीएलमधील कर्णधार म्हणून इयॉन मॉर्गनचा पहिला सामना अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सने ८ गड्यांनी आणि तीन षटके राखून दणदणीत विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा पराभव केला. असे असले, तरी मॉर्गनच्या नेतृत्वावर इतक्यात प्रश्न निर्माण करता येणार नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या दिवशीच दिनेश कार्तिकने केकेआरचे नेतृत्व सोडल्याची बातमी मिळाली. सहाजिकच मॉर्गनला पूर्णपणे सज्ज होण्यासाठी वेळ मिळालाच नाही.

पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये मॉर्गन कर्णधार म्हणून उत्कृष्ट आहे. पण त्याआधी कार्तिकच्या निर्णयाचा आपल्याला विचार करावा लागेल. याबाबत अनेक गोष्टी कानावर आल्या आहेत. काही सूत्रांकडून माहिती मिळाली की, केकेआर संघ व्यवस्थापन कार्तिकच्या नेतृत्वात होणाऱ्या वाटचालीबाबत नाराज होते आणि त्यामुळे संघात काही प्रमाणात नाराजीही होती. काही सूत्रांनुसार फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्तिकने नेतृत्व सोडले. 

अशा अनेक गोष्टी कानावर येत राहतात. पण एक गोष्ट अशी नक्की असू शकते की, केकेआर संघाने कर्णधाराकडून बाळगलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. यामुळे कदाचित कार्तिक स्वत:वरही निराश झाला असेल.

आयपीएलच्या मध्यावर एखाद्या कर्णधाराने संघाचे नेतृत्व सोडण्याची ही पहिली वेळ नक्कीच नाही. २०१९ साली राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडून स्टीव्ह स्मिथकडे आले होते. २०१३ साली मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रिकी पाँटिंगकडून रोहित शर्माकडे आले होते. कर्णधार बदलण्यामागे जे काही कारण असेल, त्यामागे कुणीही सकारात्मक निकालाचे आश्वासन देणार नाही. राजस्थानचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, त्यांचा संघ या नंतरही झगडतानाच दिसला. अपवाद राहिला तो मुंबई इंडियन्सचा. मुंबईने रोहितच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करत चार वेळा जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या मध्यावर कर्णधार बदलल्याने त्या कर्णधाराला पूर्णपणे नवीन लक्ष्य मिळालेले असते. यामुळे नव्या कर्णधारावर दबाव तर असतोच, पण हाच दबाव संघ सहका-ऱ्यांवरही असतो.

टॅग्स :अयाझ मेमनदिनेश कार्तिककोलकाता नाईट रायडर्स