न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना मंगळवारी नेपीएर येथील मॅकलीन पार्कवर खेळवण्यात आला. पाकिस्ताननं तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून लाज वाचवली. न्यूझीलंडनं ही मालिका २-१ अशी जिंकली. पण, या सामन्यात चक्का सूर्यकिरणांनी व्यत्यय आणला. पाऊस किंवा अंधुक प्रकाशामुळे क्रिकेटच्या सामन्यात व्यत्यय आल्याचे अनेकदा ऐकले असेल, पण हा सामना सूर्यामुळे थांबवण्यात आला
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ११.४ षटकांत ३ बाद ८५ धावा असताना मैदानावरील पंचांनी सामना थांबवण्याचा इशारा केला. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे फलंदाजाला चेंडू दिसेनासा झाला आणि त्यामुळे हा सामना काही काळ थांबवण्यात आला. यापूर्वीही गतवर्षी भारत-न्यूझीलंड यांच्यातला नेपीएर येथे खेळवण्यात आलेला वन डे सामना ३० मिनिटे थांबवण्यात आला होता.
न्यूझीलंडनं २० षटकांत ७ बाद १७३ धावा केल्या. पाकिस्ताननं चार विकेट्स राखून हे लक्ष्य पार केले. व्यत्ययानंतर सुरु झालेल्या सामन्यात डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप यांनी न्यूझीलंडला मोठी मजल मारून दिली. कॉनवेनं ४५ चेंडूंत ६३ धावा केल्या. फिलिपने ३१ धावा केल्या आणि या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावा जोडल्या. पाकिस्तानी गोलंदाज फहीम अश्रफ याने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवाननं ५९ चेंडूंत ८९ धाववांची खेळी केली. मोहम्मद हाफिजनं २० चेंडूंत ४१ धावा करताना त्याला दमदार साथ दिली.