Join us  

बंगाल संघ १३ वर्षांनंतर अंतिम फेरीत, उपांत्य लढतीत कर्नाटकवर मात

सहा बळींच्या जोरावर बंगालने रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत चौथ्या दिवशी मंगळवारी येथे कर्नाटकचा १७४ धावांनी पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 3:52 AM

Open in App

कोलकाता : वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करीत घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर बंगालने रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत चौथ्या दिवशी मंगळवारी येथे कर्नाटकचा १७४ धावांनी पराभव केला. या दिमाखदार विजयासह तब्बल १३ वर्षांनंतर बंगाल संघाने रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.मुकेशने ६१ धावांत ६ बळी घेतले. ३५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकचा दुसरा डाव ५५.३ षटकांत १७७ धावांत संपुष्टात आला. बंगालतर्फे ईशान पोरेल व आकाश दीप यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बंगालतर्फे सामन्यातील सर्व २० बळी वेगवान गोलंदाजांनी टिपले.कर्नाटकने ३ बाद ९८ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात करताना १६.३ षटकांत ७९ धावांमध्ये उर्वरित सात बळी गमावले. बंगालने यापूर्वी रणजी जेतेपद १९८९-९० च्या मोसमात सौरव गांगुलीच्या पदार्पणादरम्यान मिळवले होते, तर संघाने यापूर्वी २००७ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण, त्यावेळी त्यांना मुंबईविरुद्ध १३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अंतिम फेरीत बंगालला गुजरात व सौराष्ट्र यांच्यादरम्यान राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.अंतिम सामना ९ मार्चपासून खेळला जाईल, पण बंगाल संघाला ही निर्णायक लढत प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळावी लागेल. बंगालने कर्नाटकला यंदाच्या मोसमात जेतेपदांची हॅट््ट्रिक साधण्यापासून रोखले. कर्नाटकने अलीकडेच देशांतर्गत एकदिवसीय (विजय हजारे ट्रॉफी) व टी२० स्पर्धा (सैयद मुश्ताक अली ट्रॉफी) जिंकलेली आहे. संघाने यापूर्वी २०१४-१५ मध्ये सलग दुसऱ्यांदा सर्व स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)