कोलकाता : सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) गुरुवारी राज्य संघटनांना स्थानिक स्पर्धांच्या आयोजनासाठी झालेला खर्च बीसीसीआयतर्फे प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविले.
सीओएने बीसीसीआयला राज्य संघटनांना ७५ कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्याची परवानगी दिली असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. ज्या राज्य संघटनांनी आपल्या खर्चाचा तपशील सादर केला आहे त्यांना रक्कम प्रदान करण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबरला दिलेल्या आदेशामध्ये सीओएला सूचना करण्यात आली आहे की, काही राज्य संघटनांनी स्थानिक स्पर्धांसाठी येणाºया खर्चाच्या रकमेची मागणी केली आहे.
सीओएने ईमेलमध्ये म्हटले आहे की, ‘क्रिकेटच्या हितासाठी संबंधित राज्य संघटनांनी कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करायला नको. प्रशासकांच्या समितीच्या मते स्थानिक स्पर्धांच्या आयोजनासाठी होणाºया खर्चाची रक्कम बीसीसीआयतर्फे प्रदान केली जाऊ शकते.’
बीसीसीआयची अर्थ समिती बीसीसीआयला संबंधित राज्य संघटनेतर्फे सोपविण्यात आलेल्या अहवालाची समीक्षा करेल. (वृत्तसंस्था)