Ball tampering : एक वर्षाची घालण्यात आलेली बंदी योग्य

यंदाच्या आयपीएलमध्ये स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही खेळणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दोघेही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार होते, हे विशेष.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:58 AM2018-03-29T02:58:02+5:302018-03-29T02:58:02+5:30

whatsapp join usJoin us
Ball tampering: One-year ban allowed | Ball tampering : एक वर्षाची घालण्यात आलेली बंदी योग्य

Ball tampering : एक वर्षाची घालण्यात आलेली बंदी योग्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
यंदाच्या आयपीएलमध्ये स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही खेळणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दोघेही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार होते, हे विशेष. राजस्थान रॉयल्सने दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करतानाच, संघाच्या नेतृत्वाची धुरा स्मिथकडे सोपविली होती, तर गेल्या अनेक वर्षांपासून वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत होता. त्यात या दोघांनी केवळ कर्णधारपद सोडले नसून, हे दोन्ही खेळाडू यंदा आयपीएलही खेळणार नसल्याचे बीसीसीआय आणि आयसीसीने स्पष्ट केले. याचे मुख्य कारण म्हणजे ‘क्रिकेट आॅस्टेÑलिया’ने (सीए) या दोन्ही खेळाडूंवर १२ महिन्यांची बंदी घातली आहे, तसेच युवा खेळाडू कॅमेरुन बेनक्रॉफ्टला ९ महिन्यांच्या बंदीची शिक्षा केली आहे. हे तिन्ही खेळाडू चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी दोषी पकडले गेले होते. बेनक्रॉफ्टने नुकतीच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण स्मिथ आणि वॉर्नर हे दोघेही दिग्गज खेळाडू होते. यामुळेच आयपीएलमध्ये या दोन्ही खेळाडूंच्या फ्रेंचाइजींना एकप्रकारचा झटकाच बसला आहे. असे असले, तरी माझ्या मते हा निर्णय योग्य आहे.
ज्या प्रकारे लीग खेळविली जाते, ते पाहता बीसीसीआय आणि आयपीएलकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता. कारण जेव्हा कधी विदेशी खेळाडूंना आपल्या लीगमध्ये खेळविण्यास बोलाविण्यात येते, तेव्हा त्या खेळाडूच्या बोर्डकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र (एनओसी) मागविण्यात येते. त्यानुसार, बीसीसीआयला आॅस्टेÑलियन खेळाडूंना खेळविण्यासाठी ‘सीए’कडून एनओसी घ्यावे लागते. आता या सर्व घडामोडी झाल्यानंतर, या दोन्ही खेळाडूंवर बंदी लागल्यानंतर, त्यांना आयपीएलमध्ये खेळविण्यासाठी बीसीसीआयला सीएकडून ‘एनओसी’ही मिळाली नसती. याशिवाय, जेव्हा कधी फसवणुकीचा, भ्रष्टाचाराचा किंवा शिस्तीचा मुद्दा येतो, तेव्हा सर्व संघटना अंतर्गत राजकारण दूर ठेवून एकत्रित येतात. असे झालेही पाहिजे. कारण जगात क्रिकेट खेळणारे देश खूप कमी आहेत आणि याच संघटनांमध्ये वाद असतील, तर खेळाची प्रगती होणार नाही. जर अशी शिक्षा भारतीय खेळाडूला झाली असती, तर त्या खेळाडूला बाहेरच्या देशात खेळण्याची परवानगी कधीच मिळाली नसती. त्यामुळेच बीसीसीआय, आयपीएल यांनी घेतलेला निर्णय योग्य असून, जे काही प्रकरण घडले, त्याला अशा शानदार लीगमध्ये कोणतेही स्थान नाही, असे मला वाटते.
स्मिथ आणि वॉर्नरवर लावण्यात आलेल्या एक वर्ष बंदीची शिक्षा योग्य आहे की नाही, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. यावर मी एक बाजू मांडू इच्छितो की, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, ही बंदी आयसीसीने लावली नसून, ‘सीए’ने लावली आहे. आयसीसीच्या कारवाईनुसार स्मिथवर एका सामन्याची बंदी आणि १०० % सामनाशुल्क दंड ठोठावला होता. बॅनक्रॉफ्टला ७५ %, तर वॉर्नरविरुद्ध आयसीसीने कोणतीही शिक्षा सुनावली नव्हती. आता या तिन्ही खेळाडूंवर ‘क्रिकेट आॅस्टेÑलिया’ने बंदी घातली आहे. त्यामुळे हा सीएचा स्वतंत्र निर्णय आहे. कारण या प्रकरणाचा सर्वाधिक झटका क्रिकेट आॅस्टेÑलियाला बसला आहे. याचे कारण म्हणजे, आॅस्टेÑलियाने अनेक वर्षांपासून गर्व बाळगला आहे की, आम्ही खूप कठोर क्रिकेट खेळतो, पण प्रामाणिक किंवा पारदर्शी खेळतो. मात्र, स्मिथ-वॉर्नर प्रकरणाने जगासमोर सिद्ध झाले आहे की, आॅस्टेÑलिया कठोर खेळत असतील, पण पारदर्शी किंवा प्रामाणिकपणे अजिबात नाही खेळत. त्यामुळे हा त्यांच्यासाठी खूप मोठा झटका आहे.
एक वर्षाच्या बंदीविषयी सांगायचे झाल्यास, ‘सीए’ने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. जर याहून कमी शिक्षा झाली असती, तर इतर खेळाडूंना इशारा किंवा संदेश मिळाला नसता, तसेच याहून अधिक शिक्षाही देऊ शकत नव्हते. कारण या आधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण घडले आहे. एक मात्र नक्की की, हे बंदी लागलेले वर्ष सरेल, पण या प्रकरणाने कायम स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट यांची मान शरमेने झुकलेली असेल.

Web Title: Ball tampering: One-year ban allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.