Join us  

आॅस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

मेलबोर्न : नो बॉलवर सुदैवी ठरल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मंगळवारपासून इंग्लंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत दमदार सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर ३ बाद २४४ धावांची मजल मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:24 AM

Open in App

मेलबोर्न : नो बॉलवर सुदैवी ठरल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मंगळवारपासून इंग्लंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत दमदार सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर ३ बाद २४४ धावांची मजल मारली.वैयक्तिक ९० धावा झाल्यानंतर वॉर्नरला शतक पूर्ण करण्यासाठी ४० मिनिट प्रतीक्षा करावी लागली. तो ९९ धावांवर असताना पदार्पणाची लढत खेळणाºया टॉम कुरेनच्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मिड आॅनवर झेलबाद झाला होता; पण इंग्लंडला अधिक वेळ जल्लोष साजरा करता आला नाही. रिप्लेमध्ये कुरेनचा पाय क्रीझच्या बाहेर असल्याचे दिसून आले. पंचानी नो बॉल जाहीर करीत वॉर्नरला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले. वॉर्नरने पुढच्याच चेंडूवर एकेरी धाव घेत १३० चेंडूंमध्ये २१ वे शतक पूर्ण केले.सलग चौथ्या बॉक्सिंग डे कसोटीत शतकाकडे वाटचाल करीत असलेला स्मिथ दिवसअखेर ६५ धावांवर खेळत होता. शॉन मार्श ३१ धावा काढून त्याची साथ देत होता.स्मिथ २०१४ च्या बॉक्सिंग डे कसोटीपासून मेलबोर्न कसोटीमध्ये कधीच बाद झाला नाही. गेल्या तीन बॉक्सिंग डे कसोटीमध्ये स्मिथने भारताविरुद्ध १९२, वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १३४ आणि गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध नाबाद १६५ धावांची खेळी केली.स्मिथने आतापर्यंत मालिकेत पाच डावांमध्ये १६३.६६ च्या सरासरीने ४९१ धावा केल्या आहेत. आॅस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात बिनबाद १०२ धावांची मजल मारली होती. उर्वरित दोन सत्रामध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.शतक पूर्ण झाल्यानंतर वॉर्नर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टॉकडे झेल देत माघारी परतला. त्याने १५१ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली.वॉर्नरने आपल्या ७० व्या कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला गाठला.तो आॅस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये हाआकडा सर्वांत लवकर गाठणाºयांच्या यादीत ग्रेग चॅपेलसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे. या यादीतडॉन ब्रॅडमन, रिकी पाँटिग व मॅथ्यूहेडन त्याच्यापेक्षा आघाडीवरआहेत. (वृत्तसंस्था)>१२२ धावांची भागीदारीआॅस्ट्रेलियाने उपाहारानंतर सलामीवीर फलंदाज कॅमरन बेनक्रॉफ्टची विकेट मिळविली. तो ३५ व्या षटकात२६ धावा काढून ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीला१२२ धावांची भागीदारी केली.त्याआधी, आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाटा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने चहापानानंतर उस्मान ख्वाजा (१७) याला बाद करीत इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिले.>धावफलकआॅस्ट्रेलिया पहिला डाव : कॅमरन बेनक्रॉफ्ट पायचित गो. व्होक्स २६, डेव्हिड वॉर्नर झे. बेयरस्टॉ गो. अँडरसन १०३, उस्मान ख्वाजा झे. बेयरस्टॉ गो. ब्रॉड १७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६५, शॉन मार्श खेळत आहे ३१. अवांतर (०२). एकूण ८९ षटकांत ३ बाद २४४. बाद क्रम : १-१२२, २-१३५, ३-१६०. गोलंदाजी : अँडरसन २१-८-४३-१, ब्रॉड १९-६-४१-१, व्होक्स १९-४-६०-१, मोईन ६-०-३५-०, कुरेन १७-५-४४-०, मलान ७-१-२०-०.