ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा ठरला गोलंदाजांचा शहेनशाह

विश्वचषकात सर्वांत यशस्वी गोलंदाज; अव्वल दहा गोलंदाजांमध्ये दोन भारतीयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:53 AM2019-05-21T04:53:41+5:302019-05-21T04:53:46+5:30

whatsapp join usJoin us
Australia's Glenn McGrath is the bowler with Shahenshah | ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा ठरला गोलंदाजांचा शहेनशाह

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा ठरला गोलंदाजांचा शहेनशाह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडने मायदेशात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांत फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढताना गोलंदाजांची बेदम पिटाई केली. त्यामुळेच यंदा इंग्लंडमध्ये होणाºया विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी गोलंदाजांची कामगिरी पाहिल्यास नक्कीच त्यातून यंदाच्या विश्वचषकातील गोलंदाजांना प्रेरणा मिळेल. विश्वचषक इतिहासामध्ये सर्वाधिक बळी घेण्यात आॅस्टेÑलियाचा ग्लेन मॅकग्रा आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या दोन स्थानांवर असून अव्वल दहामध्ये दोन भारतीय गोलंदाजांनीही स्थान मिळवले आहे.

ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) :
विश्वचषक स्पर्धेत ७० हून अधिक बळी घेणारा एकमेव गोलंदाज असलेला मॅकग्रा या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज आहे. १९९६-२००७ या कालावधीत त्याने विश्वचषकातील ३९ सामने खेळताना १८.१९च्या सरासरीने ७१ बळी घेतले आहेत. मॅकग्राच्याच नावावर १५ धावांत ७ बळी या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद आहे. तसेच त्याने दोनवेळा सामन्यात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरीही केली आहे.


मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) :
विश्वचषकातील दुसºया क्रमांकाचा सर्वांत यशस्वी गोलंदाज असलेल्या मुरलीधरनच्या नावावर ६८ बळींची नोंद आहे. कारकिर्दीत ५ विश्वचषक स्पर्धा खेळताना त्याने ४० सामन्यांत १९.६३ च्या सरासरीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची ‘फिरकी’ घेतली आहे. १९ धावांत ४ बळी ही मुरलीधरनची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.


जवागल श्रीनाथ (भारत) :
भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज श्रीनाथ याने विश्वचषकातील यशस्वी गोलंदाजांच्या यादीत सहावे स्थान मिळविताना ३४ सामन्यांत ४४ बळी मिळविले आहेत. १९९२ ते २००३ दरम्यान चार विश्वचषक स्पर्धा खेळताना श्रीनाथने २७.८१च्या सरासरीने मारा केला. ३० धावांत ४ बळी अशी श्रीनाथची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

लसिथ मलिंगा (श्रीलंका) :
‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा याने २००७ ते २०१५ पर्यंत तीन विश्वचषक स्पर्धा खेळताना २२ सामन्यांतून ४३ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे अव्वल १० गोलंदाजांमध्ये मलिंगा एकमेव गोलंदाज असा आहे जो यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही खेळेल. त्यामुळे त्याला आपल्या बळींची संख्या वाढविण्याची नक्कीच मोठी संधी आहे. त्याने आतापर्यंत २१.११च्या सरासरीने मारा केला असून ३८ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


अ‍ॅलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका) :
अव्वल १० गोलंदाजांमध्ये एकमेव आफ्रिकी गोलंदाज असलेल्या डोनाल्डने १९९२ ते २००३ दरम्यान २५ विश्वचषक सामने खेळताना २४.०२च्या सरासरीने ३८ बळी घेतले आहेत. १७ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


जेकब ओरम (न्यूझीलंड) :
वेगवान गोलंदाज ओरमने २००३ ते २०११ दरम्यान तीन विश्वचषक स्पर्धा खेळताना २३ सामन्यांतून ३६ बळी मिळविले. ३९ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

वसीम अक्रम (पाकिस्तान) :
अचूकता आणि भेदक स्विंग गोलंदाजीने फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या अक्रमने पाच विश्वचषक स्पर्धा खेळताना ३८ सामन्यांत २३.८३च्या सरासरीने ५५ बळी घेतले आहेत. १९८७ ते २००३ दरम्यानच्या विश्वचषक स्पर्धा खेळताना अक्रमची सर्वोत्तम कामगिरी २८ धावांत ५ बळी अशी आहे.


झहीर खान (भारत) :
विश्वचषकातील यशस्वी अव्वल पाच गोलंदाजांमध्ये समावेश असलेला झहीर भारताचा एकमेव गोलंदाज. स्विंग आणि भेदक यॉर्करसाठी ओळखला जाणाºया झहीरने २००३ ते २०११ दरम्यान तीन विश्वचषक स्पर्धांत भारतासाठी भेदक मारा केला. त्याने २३ सामन्यांत २०.२२च्या सरासरीने मारा करताना ४४ बळी मिळविले. ४२ धावांत ४ बळी अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


चामिंडा वास (श्रीलंका) :
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज वास याने १९९६ ते २००७ दरम्यान चार विश्वचषक स्पर्धा खेळल्या. यामध्ये त्याने ३१ सामने खेळताना २१.२२च्या सरासरीने ४९ बळी मिळविले आहेत.

डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड) :
न्यूझीलंडचा दिग्गज फिरकी गोलंदाज व्हिटोरीने २००३ ते २०१५ दरम्यान ४ विश्वचषक स्पर्धा खेळताना ३२ सामन्यांतून ३६ फलंदाजांना माघारी पाठविले आहे. १८ धावांत ४ बळी अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Web Title: Australia's Glenn McGrath is the bowler with Shahenshah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.