बंगळुरू: आॅस्ट्रेलियाने गुरुवारी झालेल्या चौथ्या एकादिवसीय सामन्यात यजमान भारताविरुद्ध २१ धावांनी विजय नोंदवित सलग पराभवाची मालिका खंडित केली. मात्र यानंतरही मुख्य प्रशिक्षक डेव्हिड साकेर संघाच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. आमच्या चांगल्या कामगिरीपैकी ही कामगिरी नव्हती, अशा शब्दात साकेर यांनी स्वत:ची नाराजी व्यक्त केली.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना साकेर यांनी म्हटले की, ‘ही कामगिरी आमच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपैकी एक नव्हती. आम्ही ३४ व्या षटकापर्यंत चांगला मारा केला. पण विचार केला होता त्यानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. सुरुवातीपासून चांगला मारा करू शकलो नाही. अखेर विजय मिळाला खरा, पण हे निर्भेळ यश नाही. मात्र, त्यातल्या त्यात आम्ही सामना जिंकलो ही समाधानाची बाब.’
डेव्हिड वॉर्नरने शंभराव्या सामन्यात शानदार १२४ धावा कुटल्या. वार्नरचे कौतुक करीत साकेर पुढे म्हणाले, ‘सामना आमच्या हातून निसटत चालला होता. परंतु, मोक्याच्या क्षणी गडी बाद होत गेल्याने भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. अखेरच्या दहा षटकांत गोलंदाजांनी चांगला मारा केल्याने सामना आमच्या बाजूने झुकला. डेथ ओव्हर्समध्ये केलेला टिच्चून मारा आॅस्टेÑलिया संघासाठी निर्णायक ठरला. अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल.’ (वृत्तसंस्था)