भारताने ईडन गार्डनवर आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामनाही सहजपणे जिंकला. या सामन्यात कमी धावा झाल्या. कारण एकवेळ अशी होती की भारतीय संघ तीनशेचा टप्पा पार करेल, असे वाटत होते. १८०च्या आसपास ३ बळी होते आणि त्यानंतर फलंदाजी कोसळली होती. त्यानंतर भारताने केवळ २५२ धावा काढल्या. आॅस्ट्रेलियाकडे मालिकेत पुनरागमन करण्याची ही एक संधी होती. पण, ज्या प्रकारे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी गोलंदाजी केली, त्यावरून एक स्पष्ट झाले आहे की, लेगस्पिनरविरुद्ध आॅसी फलंदाज लडखडत आहेत. पहिल्या सामन्यानंतर दुसºया सामन्यातही हे पाहायला मिळाले. आॅस्टेÑलियाने पहिल्या सामन्यातील चुकांपासून काहीच बोध घेतला नसल्याचेही या वेळी दिसून आले. एक प्रकारे आॅसी फलंदाजांवर फिरकी गोलंदाजांचा मानसिक दबाव आला असल्याचेही म्हणता येईल. कारण, आॅस्टेÑलियाने सरावासाठी भारतातून एक लेगस्पिनर मागवला होता. यानंतरही जर अशा प्रकारची सुमार कामगिरी होत असेल, तर हे मोठे अपयश आहे. तसेच, मझ्या मते आॅसी संघ मोठ्या प्रमाणात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर अवलंबून राहत असल्याचे दिसत आहे. पण वॉर्नरचा भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट रेकॉर्ड खराब आहे आणि या मालिकेतही तीच कामगिरी कायम राहिली आहे. दुसरीकडे, स्मिथने अर्धशतक झळकावले, पण तो संघाला विजयी करू शकला नाही. त्यामुळेच, संधी गमावल्याचे दु:ख आॅसीला असेल.
भारताचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ज्या प्रकारे टीम इंडियाने लढवय्या खेळ केला, त्यावरून संघाची मानसिकता लक्षात येते. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती दिसून आली. यात कर्णधाराचा वाटा मोठा आहे. कोहलीने शानदार कॅप्टन्स इनिंगही खेळली. त्याचे ३१वे शतक हुकले, पण फलंदाजी शानदार झाली. जर, त्याचे योगदान मिळाले नसते, तर मात्र नक्कीच धावसंख्या आणखी कमी झाली असती.
आतापर्यंत जे काही प्रयोग टीम इंडियाने केले आहेत, ते सर्व यशस्वी ठरले आहेत. यादव, चहल यांनी छाप पाडलीच; पण ज्या प्रकारे बुमराह व भुवनेश्वरने गोलंदाजी केली, ते जबरदस्त होते. यामुळे उमेश यादव, मोहम्मद शमी, रविचंद्र आश्विन व रवींद्र जडेजा या प्रमुख गोलंदाजांसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकूणच, सध्या भारतीय संघात तीव्र स्पर्धा असून, हे उत्कृष्ट गुणवत्तेचे लक्षण आहे. त्यामुळेच मला वाटते की टीम इंडिया या मालिकेतही क्लीनस्वीप करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.