Join us  

आॅस्ट्रेलियाविरुद्ध आश्विन यशस्वी ठरेल : पुजारा

आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या आगामी मालिकेत रविचंद्रन आश्विन शानदार कामगिरी करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 4:37 AM

Open in App

अ‍ॅडिलेड : आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या आगामी मालिकेत रविचंद्रन आश्विन शानदार कामगिरी करेल कारण या आॅफ स्पिनरने तंत्रामध्ये काही बदल करीत भात्यात नव्या अस्त्रांचा समावेश केला आहे, असे भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हटले आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पहिला कसोटी सामना ६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. आश्विनने आॅस्ट्रेलियामध्ये ६ कसोटी सामन्यांत ५४.७१ च्या सरासरीने केवळ २१ बळी घेतले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २५.४४ च्या सरासरीने ३३६ बळी घेतले आहेत.पुजारा म्हणाला, ‘‘तो हुशार गोलंदाज असल्याचे मी नेहमीेच म्हणतो. तो फलंदाजांची मानसिकता चांगल्याप्रकारे ओळखतो. त्याने तंत्रामध्ये बराच बदल केला आहे. त्याने कुठले बदल केले हे मी सांगू शकत नाही, पण जे बदल केले आहेत त्यामुळे त्याला मदत मिळत आहे.’’त्याने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटही खेळले आहे. तेथील खेळपट्ट्या वेगळ्या आहेत. तेथे फिरकीपटूंना मदत मिळत नाही.’’पुजारा पुढे म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियात काय करायचे आहे, याची त्याला कल्पना आहे. तो येथे २०१४-१५ च्या मालिकेत खेळला होता. आता त्याचा आत्मविश्वास उंचावलेला असून त्याला जे बदल करायचे होते ते त्याने केलेले आहेत.’ भारतीय फलंदाजी विराट कोहलीवर अवलंबून असल्याचे विचारले असता पुजारा म्हणाला, इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतरही फलंदाजांवर कुठले दडपण नाही. फलंदाजीमध्ये सांघिक कामगिरी अपेक्षित आहे. अतिरिक्त दडपण घेण्याची गरज नाही. संघातील अनेक फलंदाज अनुभवी आहे. त्यामुळे आमचा आपल्या तयारीवर आणि क्षमतेवर विश्वास आहे.’’ भारताचे सध्याचे वेगवान गोलंदाजी आक्रमण सर्वोत्तम असल्याचे सांगताना मजबूत राखीव बेंच स्ट्रेंथचे श्रेय आयपीएलला असल्याचे पुजारा म्हणाला.पुजाराने सांगितले की, ‘‘राखीव खेळाडूंबाबत विचार करता एक दुखापतग्रस्त झाला तर त्याचा पर्याय सज्ज असतो. वेगवान गोलंदाजांबाबतही हेच म्हणता येईल. आयपीएलमुळे आम्हाला अनेक चांगले वेगवान गोलंदाज मिळाले आहे. त्याचा लाभ कसोटी क्रिकेटला होत आहे.’’ (वृत्तसंस्था)