Is MS Dhoni quitting IPL too? CSK skipper's post-match gestures see fans speculate retirement | महेंद्रसिंग धोनी IPLमधूनही निवृत्त होतोय? CSKच्या कर्णधाराच्या 'त्या' कृतीनं सुरू झालीय कुजबूज

महेंद्रसिंग धोनी IPLमधूनही निवृत्त होतोय? CSKच्या कर्णधाराच्या 'त्या' कृतीनं सुरू झालीय कुजबूज

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाचे वर्ष काही खास ठरताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दम दाखवेल आणि टीकाकारांची तोंड बंद करेल, असा कयास लावला जात होता. पण, प्रत्यक्षात घडले वेगळे आणि टीकाकारांना आयतं कोलित मिळालं. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSKला आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही, तर गुणतालिकेत त्यांना तळावरही प्रथमच समाधान मानावे लागले. त्यामुळे धोनीवर टीका होत आहे. त्यात सामन्यानंतर धोनीकडून होत असलेल्या कृतीमुळे कॅप्टन कूल आयपीएलमधूनही निवृत्ती घेतोय की काय, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं सॅम कुरननं ४७ चेंडूंत ५२ धावांच्या जोरावर ९ बाद ११४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांनी दमदार खेळ करताना मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. इशान किशन ३७ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहीला. क्विंटन डी'कॉकनं ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सनं दहा विकेट्स राखून विजय मिळवताना चेन्नई सुपर किंग्सचे Play Offमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. या सामन्यानंतर धोनीनं त्याच्या नावाची जर्सीवर स्वाक्षरी करून ती हार्दिक व कृणाल पांड्या यांना भेट म्हणून दिली. धोनीच्या या कृतीनंतर तो आयपीएलमधून निवृत्त होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.  याआधीही धोनीनं राजस्थान रॉयल्सच्या सामन्यानंतर जोस बटलरला त्याची जर्सी दिली होती.  






सामन्यानंतर CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला,'' नेमकं काय चुकलं याचा विचार करायला हवा. विषेश करून या वर्षी, हे आमचं वर्ष नव्हतं. या लीगमधील संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती आणि त्यामुळे तुम्ही ८ किंवा १० विकेट्सनं हरलात, तर त्यानं दुःख होतच. संघातील प्रत्येक सदस्य दुखी आहे. दुसऱ्या सामन्यापासून नक्की काय चुकलं, हे पाहायला हवं. हा फक्त गोलंदाजीचा विषय नाही. अंबाती रायुडू दुखापतग्रस्त झाला, अन्य फलंदाजांनी त्यांचे २००% योगदान दिले नाही.''

''क्रिकेटमध्ये अशा खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो, तेव्हा तुम्हाला नशिबाचीही साथ लागते. तुमची कामगिरी चांगली होत नाही, तेव्हा १०० कारणे असतात, परंतु आपण त्या ताकदीनं खेळलो का, हे स्वतःला विचारायला हवं. हा पार्ट अँड पार्सलचा भाग आहे. प्रत्येक वेळी निकाल तुमच्याच बाजूने लागेल असं होणार नाही,'' असेही धोनी म्हणाला.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Is MS Dhoni quitting IPL too? CSK skipper's post-match gestures see fans speculate retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.