दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) आतापर्यंत पंजाबच्या लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांनी शतकं झळकावली आहेत. याशिवाय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, चेन्नईचा फॅफ ड्युप्लेसी, राजस्थानचा संजू सॅमसन सुरेख फटकेबाजी करत आहेत. मात्र रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला नाही. आरसीबीचा संघ ३ पैकी २ सामने जिंकत गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. मात्र कोहली सातत्यानं अपयशी ठरताना दिसत आहे.
आरसीबीचा संघ यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. या तिन्ही सामन्यांत विराटनं फलंदाजी केली आहे. त्यानं ३ सामन्यांत केवळ १८ धावा केल्या आहेत. यामध्ये हैदराबादविरुद्ध १४, पंजाबविरुद्ध १ आणि मुंबईविरुद्धच्या ३ धावांचा समावेश आहे. आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच विराटला सुरुवातीच्या ३ सामन्यांत इतक्या कमी धावा करता आल्या आहेत.
मार्चमध्ये देशात लॉकडाऊन झाला. त्यामुळे खेळाडूंना पुरेसा सराव करता आला नाही. एप्रिलमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये अनुष्का विराटला 'ए कोहली चौका मार ना', असं मजेशीरपणे म्हणत होती. त्यानंतर जवळपास ५ महिन्यांनी दुबईत आयपीएलला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंच्या ३ सामन्यांत तरी विराटला चौकार मारता आलेला नाही.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून विराट आरसीबीकडून खेळत आहे. आतापर्यंतच्या १२ हंगामात मिळून कोहलीनं १७७ सामन्यांमध्ये ५ हजार ४१२ धावा फटकावल्या आहेत. विराटची सरासरी ३७.८४ इतकी असून त्याचा स्ट्राईक रेट १३१.६१ इतका आहे. त्यानं आतापर्यंत ५ शतकं आणि ३६ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या ११३ आहे.
विराटची आतापर्यंतची आयपीएलमधील कामगिरी (सौजन्य- www.iplt20.com)![]()