ठळक मुद्देरिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकी खेळीहनुमा विहारी व आर अश्विन दुखापतग्रस्त असूनही ऑसींनी भिडलेविहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी निर्णायक

India vs Australia, 3rd Test Day 5 : कोण म्हणतं कसोटी क्रिकेट कंटाळवाणं आहे?, व्ही व्ही एस लक्ष्मणच्या या प्रश्नानं सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग यानं टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला असताना भारतीय फलंदाजांनी त्याच्या मुस्काटात मारणारी कामगिरी करून दाखवली. ४०७ धावांच्या लक्ष्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज ढेपाळतील असा तर्क लावणारेही गपगुमान कोपऱ्यात जाऊन बसले असतील. दुखापतग्रस्त खेळाडूंसह टीम इंडियानं हा सामनाच वाचवला नाही, तर ऑस्ट्रेलियाला तोडीत तोड उत्तर दिले. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्या संयमाची त्याला साथ मिळाली. मांडीचे स्नायू ताणल्यानंतर धाव घेण्यासाठी संघर्ष करणारा हनुमा विहारी सहाव्या विकेटसाठी आर अश्विनसह खेळपट्टीवर नांगर रोवून राहिला. या दोघांनी 250+ चेंडू खेळून काढताना सामना अनिर्णित राखला. 

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानं टीम इंडियावरील संकट वाढलं.. आता काही खरं नाही, असं वाटत असताना रिषभ मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूनं चेतेश्वर सपोर्टीव्ह नायकाची भूमिका पार पाडत होताच. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला त्यानं विजयाचे किरण दाखवले. दुर्दैवानं ९७ धावांवर तो बाद झाला. हनुमा विहारीचा फॉर्म पाहता, आता टीम इंडियाचं काही खरं नाही, असंच वाटत होते. त्यामुळे फ्रॅक्चर अंगठा असूनही रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) गरज पडल्यास फलंदाजीला येण्यासाठी सज्ज होताच. सेट फलंदाज चेतेश्वर ७७ धावांवर माघारी परतला. विहारीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढली. पण, विहारी खेळपट्टीवर अडून बसला. 


ऑसी गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा करून आर अश्विनलाही दुखापतग्रस्त करण्याचा प्रयत्न केला. पण, अश्विन व विहारी यांचा संयमी खेळ सुरूच आहे. या दोघांनी २०० हून अधिक चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कसोटी पाहिली.  अश्विन-विहारीचा दृढनिश्चय पाहून ऑसींचा संयमाचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. पायाला दुखापत झाली असूनही विहारी १०० हून अधिक चेंडू खेळला. त्यानं ६.२५च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. भारतीय फलंदाजांकडून ही सर्वात संथ ( चेंडूंचा सामना) खेळी ठरली. यापूर्वी १९८०/८१मध्ये यशपाल शर्मा यांनी १५७ चेंडूंत १३ धावा केल्या होत्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट ८.२८ इतका होता. 


ऑस्ट्रेलियात मागील दहा वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक षटकं खेळणाऱ्या संघात टीम इंडियानं तिसरे स्थान पटकावले. भारतानं १२० षटकं खेळली. दिवसाचा खेळ संपण्यासाठी १० षटकं शिल्लक असताना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ऑसी कर्णधार टीम पेन यानं हनुमा विहारीचा झेल सोडला. आजच्या दिवसातील पेनकडून सुटलेला हा तिसरा झेल ठरला. १९९२नंतर प्रथमच भारताच्या चार फलंदाजांनी कसोटीच्या चौथ्या डावात प्रत्येकी १००+ चेंडूंचा सामना केला. आजच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा ( २०५ चेंडू), रिषभ पंत ( ११८), हनुमा विहारी ( १४९*) आणि आर अश्विन ( ११७*) यांनी ही कामगिरी केली. १९९२मध्ये  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत रवी शास्त्री, अजय जडेजा, संजय मांजरेकर व प्रविण आमरे यांनी अशी कामगिरी केली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia, 3rd Test Day 5 : R Ashwin and Hanuma Vihari bat through the session; the Test ends in a draw, History created in SCG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.