India vs Australia 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानं टीम इंडियावर बॉक्सिंग डे कसोटीतून कमबॅक करण्याचे आव्हान असणार आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मायदेशात परतल्यामुळे अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यात मोहम्मद शमी ( Mohmmed Shami) दुखापतीमुळे गुरुवारी मायदेशात परतणार असल्यानं रहाणेची डोकेदुखी वाढली आहे. पण, टीम इंडियाची ही डोकेदुखी कमी करण्यासाठी हुकूमी खेळाडू दाखल झाला आहे. त्यानं बुधवारी नेट्समध्ये टीमसोबत सरावही केला आणि BCCIनं त्याच्या सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट करून ही गुड न्यूज दिली.

विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या कसोटीत का खेळ नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. पण, त्यानंतर तो १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे आणि ३० डिसेंबरला तो संघासोबत सरावाला सुरुवात करणार आहे. दरम्यान, सिडनीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्येमुळे रोहितच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात होती. बीसीसीआयनं सांगितले की,''रोहित शर्मा सिडनीत सुरक्षित आहे. तो बायो सुरक्षित वातावरणात आहे आणि सध्या १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या संपर्कात आहेत. तेथील परिस्थिती बिघडल्यास, BCCI रोहितला तेथून बाहेर काढण्यास प्रयत्न करणार.'' 


अशात टीम इंडिया मेलबर्न येथे दाखल झाली आहे आणि त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयनं व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओत रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) सराव करताना दिसत आहे. जडेजाच्या आगमनानं टीम इंडियाची चिंता मिटली असून तो बॉक्सिंग डे साठी तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्वेंटी-२० मालिकेत जडेजाला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो विश्रांतीवर होता.


पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. वृद्धीमान सहाच्या जागी रिषभचा पर्याय आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल. संघानं पंत आणि सहा या दोघांनाही खेळवण्याचे ठरवल्यास यष्टिंमागे सहाच दिसेल, तर जडेजाला संधी मिळणे अवघड होऊन बसेल.  


दुसऱ्या कसोटीतील Playing XI - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia 2nd Test : Ravindra Jadeja back in nets and preparing for the Boxing Day Test on December 26th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.