बेलगाव : अभिमन्यू ईश्वरनचे द्विशतक व अमोलप्रीत सिंगचे शतक या जोरावर भारत ‘अ’ संघाने रविवारी पहिल्या अनौपचारीक कसोटीत श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध ५ बाद ६२२ धावसंख्येवर डाव घोषित केला. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी प्रत्युत्तरात श्रीलंका ‘अ’ संघाची ४ बाद ८३ अशी अवस्था झाली होती. श्रीलंका ‘अ’ संघ भारताच्या तुलनेत अद्याप ५३९ धावांनी पिछाडीवर आहे. अशान प्रियरंजन व निरोशन डिकवेला प्रत्येकी २२ धावा काढून खेळपट्टीवर होते.
भारताच्या विशाल धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंका ‘अ’ संघाने संगीत कुरे (०), सदीरा समरविक्रम (३१), पथुम निसांका (६) आणि भनुका राजपक्षे (०) यांच्या विकेट झटपट गमावल्या. संदीप वॉरियरने कुरे व समरविक्रम यांना
बाद केले, तर शिवम दुबेने निसांका
व प्रियरंजन यांना तंबूचा मार्ग दाखविला.
त्याआधी, भारत ‘अ’ संघाने कालच्या १ बाद ३७६ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. ईश्वरनने (२३३ धावा) पहिल्याच सत्रात द्विशतक पूर्ण केले. अकिला धनंजयच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी ईश्वरनने ३२१ चेंडूंना सामोरे जाताना २२ चौकार व ३ षटकार लगावले.
ईश्वरन याने तिसºया बळीसाठी अमोलप्रीतसोबत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अमोलप्रीतने १६५ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकारांच्या मदतीने ११६ धावांची खेळी केली. ईश्वरन
बाद झाल्यानंतर अमोलप्रीत व सिद्धेश लाड यांनी पाचव्या विकेटसाठी
१४७ धावांची भागीदारी केली. सिद्धेश्ने ८९ चेंडूंना सामोरे जाताना
६ चौकार व एक षटकाराच्या मदतीने शानदार ७६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)