तांबा तपासणी आणि गोळा करण्याचे काम बंद झाले तर रोजगाराचे काय होणार? प्रकल्पग्रस्त चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:03 IST2025-01-24T14:01:51+5:302025-01-24T14:03:30+5:30

प्रकल्पाचे काम थंडावले : बेरोजगारांत उलटसुलट चर्चा

What will happen to employment if copper screening and collection work stops? Project-affected people worried | तांबा तपासणी आणि गोळा करण्याचे काम बंद झाले तर रोजगाराचे काय होणार? प्रकल्पग्रस्त चिंतेत

What will happen to employment if copper screening and collection work stops? Project-affected people worried

पी. एच. गोरंतवार 
लोकमत न्यूज नेटवर्क 
पोंभूर्णा :
ठाणेवासना परिसरात तांब्याचे साठे आढळल्याने सरकारकडून तीन वर्षापूर्वी कंपनीला लीज देण्यात आली. कंपनीने सहा महिन्यांपूर्वी तांब्याचा डोंगर व परिसरातील भूगर्भात तांबा तपासणी व नमुने गोळा करण्याचे काम सुरू केले. मात्र, हळूहळू काम थांबविणे सुरू केल्याने कंपनी गुंडाळल्यास आमच्या रोजगाराचे काय? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगार युवक विचारत आहेत.


पोंभूर्णा तालुका वनवैभवाने नटला असून, अंधारी व वैनगंगा नदीचे तालुक्याला वरदान लाभले आहे. तालुक्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. याबाबत जिओलॉजी अॅण्ड मायनिंग आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने ठाणेवासना येथील परिसरातील जमिनीत प्राथमिक संशोधन करण्यात आले. स्थानिक प्रशासनाच्या अहवालांतर्गत शासनस्तरावरून प्रास्पेक्टिंग व खाणकाम करण्यासाठी लीजची निविदा काढण्यात आली होती. भारतीय बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील वेदांता रिसोर्सेस लिमिटेड कंपनीला शासनाने ठाणेवासना येथील कॉपर ब्लॉकची लीजवर दिली आहे.


अचानक कमी केले काम 
शासनाने ठाणेवासना परिसरातील ७६८.६२ हेक्टर एवढी जमीन वेदांता रिसोर्सेस लिमिटेडला ५० वर्षांसाठी दिली. कंपनीने अधिकची जमीन संपादनाची तयारी सुरू केली होती. त्यामुळे या प्रकल्पातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या आशा निर्माण झाल्या. मात्र, कंपनीने अचानक आपले काम कमी केले. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होणार की नाही, असा प्रश्न शेतकरी व बेरोजगार विचारत आहेत.


तीन वर्षांपूर्वी मिळाली लिज 
वेदांता कंपनी ठाणेवासना परिसरात कॉपर ब्लॉक्सचा अभ्यास करत आहे. ब्लॉक्सची व्यावसायिक व्यवहार्यता तपासल्यानंतरच तांबे उत्पादन सुरू केले जाईल. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी तांबे उत्पादन सुरू होण्यासाठी सहा वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त केला होता. कंपनीला लीज मिळून जवळपास तीन वर्षांचा काळ लोटत आहे. मात्र, कंपनीकडून काम संथ गतीने सुरू आहे.


भूगर्भात ८.०३ दशलक्ष टन तांब्याचा साठा 
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या मदतीने ठाणेवासना परिसरात काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या चमूने अभ्यास केल्यानंतर ठाणेवासना ब्लॉकमध्ये तब्बल ८.०२ दशलक्ष टन तांब्याचा साठा असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर सरकार व उद्योग कंपनीकडून हालचाली सुरू झाल्या. राज्य सरकारने प्रकल्प सुरू करण्यासाठी ही खाण अटी व शर्तीच्या आधारावर वेदांता लिमिटेड कंपनीला दिली


५० वर्षे कालावधीसाठी शेतकऱ्यांकडून जमीन संपादित केली
वेदांता रिसोर्रेसेस लिमिटेड या कंपनीला प्रास्पेक्टींग व खाणकाम करण्यासाठी ठाणेवासना कॉपर ब्लॉकची लिज देण्यात आली. सुरूवातीला ठाणेवासना येथे कंपनीचे कार्यालय उभारण्यात आले. मात्र, आता तेथे कुणी नाही. त्यामुळे त्यांची बाजू कळली नाही.


 

Web Title: What will happen to employment if copper screening and collection work stops? Project-affected people worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.