कोळसा वाहतुकीसाठी आता विसापूर जंक्शन ; रेल्वे मार्ग प्रस्तावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:41 IST2025-03-19T14:40:41+5:302025-03-19T14:41:12+5:30
बाबूपेठ ते सास्तीदरम्यान रेल्वे मार्ग प्रस्तावित : १६ हेक्टर शेती संपादित करणार

Visapur Junction now for coal transportation; Railway route proposed
सुभाष भटवलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातून तीन रेल्वे मार्ग गेले. चौथ्याचे सध्या काम सुरू आहे. आता नव्याने बाबूपेठ ते सास्ती हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला. या मार्गामुळे विसापूरला कोळसा वाहतुकीसाठी जंक्शनचे स्वरूप येणार आहे. यासाठी १६ हेक्टर शेती संपादीत केली जाईल. मात्र प्रस्तावामुळे केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करणारे शेतकरी पुढे जगाचे कसे, या प्रश्नाने धास्तावले आहेत.
रेल्वे विभागाने रेल्वे सुधारित अधिनियम १९८९ आणि भूसंपादन रेल्वे (सुधारणा) कायदा, २००८ कलम २० (अ) अन्वये नवीन बाबूपेठ ते सास्ती दरम्यान रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. प्रस्तावित मार्गासाठी विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल. भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/२०२४-२५ नुसार ७० च्या आसपास शेतीच्या खातेदारांची जमीन संपादनाच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वे मार्गात पिढीजात शेती गेल्यावर थोडा मोबदला मिळेल. मात्र, आधीच नोकरी संपल्या. पेपरमीलपासून गावाला रोजगार मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या कसे जगणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. यापूर्वी औष्णिक विद्युत केंद्र, प्लायवुड कंपनी, चुनाभट्टी आदी उद्योग होते. ते देखील काळाच्या ओघात गायब झाले.
गृहकलह वाढणार आणि गावाची नाकाबंदीही
विसापुरात एका शेत सर्वे क्रमांकावर अनेक भूधारकांची नावे आहेत. यामुळे भूसंपादनाच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक आहे. यातून गृहकलह वाढण्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे. विसापूर गावाच्या मध्यभागातून आधीच तीन रेल्वे मार्ग गेले आहेत. या मार्गामुळे अपघातांच्या घटना वाढल्या. पुन्हा पाच मार्ग झाल्यास गावाची नाकाबंदी होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
जनसुनावणीच्या तारखेकडे लक्ष
केंद्र सरकारने विसापूर शिवारात सनफ्लग कंपनीची भूमिगत कोळसा खाण मंजूर केले होते. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने जनसुनावणीही घेतली. कंपनी सोबत महाराष्ट्र सरकारने उद्योग समूहासोबत ३०० कोटी खर्चाचा करारदेखील केला होता. त्यावेळी येथील शेतकऱ्यांनी जनसुनावणीत प्रचंड विरोध केला होता. आता रेल्वे विभागाने शेतकऱ्यांची शेती संपादन करून नवीन बाबूपेठ ते सास्ती दरम्यान रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला. यावर शेतकऱ्यांची काय भूमिका असणार, याकडे लक्ष लागले आहे.
७० शेतकरी प्रस्तावित रेल्वे मार्गाने प्रकल्पग्रस्त होऊ शकतात
विसापुरात बेरोजगारी वाढली. शेतीपासूनच रोजगार मिळत आहे. नव्याने होऊ घातलेल्या रेल्वे मार्गात शेती गेली तर विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते.