ओपन स्पेसमध्ये सुरू आहे अनधिकृत टॉवरचे बांधकाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:04 IST2024-10-25T16:03:22+5:302024-10-25T16:04:10+5:30
परवानगी नाकारली, तरी बांधकाम : मार्गक्रमणाचा रस्ता होणार अरुंद

Unauthorized tower construction is going on in the open space
दत्तात्रय दलाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : येथील जुन्या मदर पेठ शाळेच्या मागे ओपन स्पेस मध्ये अनधिकृत टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. या टॉवरमध्ये रस्त्याचा बराच भाग येत असून भविष्यात येथील रहिवाशांना रहदारी करताना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या टॉवरचे बांधकाम त्वरित बंद करून ओपन स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षणाचे माहेरघर, वैद्यकीय नगरी म्हणून ओळख असलेल्या ब्रम्हपुरी शहरात बाहेरून नोकरीकरिता आलेले चाकरमानी नेहमीसाठी स्थायिक होतात. शहरात मागील १५-२० वर्षांत अनेक भागात लेआऊटची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे शहराचा परीघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लेआऊटची निर्मिती करताना ओपनस्पेस सोडली जाते. अशा ओपन स्पेसचा ताबा नगरपरिषदेकडे असतो. येथील जुन्या मदर पेठ शाळेच्या मागे जुन्या लेआऊटची निर्मिती करण्यात आली होती.
त्यावेळी अगदी रस्त्याच्या कडेला ओपन स्पेस सोडण्यात आली होती. सदर ओपन स्पेसवर अतिक्रमण करून अवैधरीत्या टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात येत आहे, त्याच्या मागील बाजूला अनेक घरे आहेत. जाण्यासाठी असलेला रस्ता टॉवरमध्ये जातो. त्यामुळे हा रस्ता अरुंद होणार आहे. आवागमन करताना नागरिकांना कमालीचा त्रास होणार आहे. ओपन स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर नगरपरिषद कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
"टॉवर बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेला मंजुरीकरिता अर्ज करून मागणी करण्यात आली होती. नगरपरिषदेने मंजुरी नाकारली असून बांधकाम थांबविण्याचे कळविले आहे. तसे लेखी पत्र देऊन पोलिस विभागाला पाठविले आहे."
-अर्थिया जुही, मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी
"नगरपरिषदेने केवळ लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे कायद्याने ते बांधकाम थांबविता येत नाही. नगरपरिषदेने लेखी तक्रार दाखल केल्यास आम्हाला संबंधितावर उचित कारवाई करता येईल."
-प्रमोद बानबले, ठाणेदार पोलिस ठाणे, ब्रम्हपुरी