दगडाला दुचाकी धडकून अपघात, दोन मित्र ठार
By राजेश भोजेकर | Updated: April 14, 2023 18:27 IST2023-04-14T18:23:39+5:302023-04-14T18:27:27+5:30
नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील घटना

दगडाला दुचाकी धडकून अपघात, दोन मित्र ठार
चंद्रपूर : वरोऱ्याहून भद्रावतीकडे रेसर बाईकने फिरण्यासाठी आलेल्या दोन मित्रांचा मानोरा फाट्याजवळ दगडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दोघेही ठार झाल्याची घटना शुक्रवारी एक वाजताच्या सुमारास घडली.
हर्ष सुरेश पाचभाई (२२) राहणार गणेश नगर वरोरा, अंकुश सुनील भडगरे (२३) राहणार सिद्धार्थ नगर वरोरा असे अपघातात ठार झालेल्या दोन युवकाचे नाव आहे.
अंकुश हा आपली बाईक घेवून त्याचा मित्र हर्षला वरोरा येथील जिम आटोपून भद्रावतीकडे रेसर बाईक क्रमांक ३४ सीसी ९६३९ ने फिरण्याकरिता येत असताना नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील भद्रावती लगतच्या मानोरा वळण रस्त्यावर बाजूला असलेल्या दगडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी होती की हे दोघेही हवेत उडून मानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपटले. यात हर्ष पाचभाई हा जागेवरच मरण पावला तर अंकुश भडगरे याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच भद्रावती पोलीस दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.