जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी

By साईनाथ कुचनकार | Updated: May 19, 2023 18:08 IST2023-05-19T18:08:12+5:302023-05-19T18:08:33+5:30

नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून एका बैलाला ठार केले असून दुसऱ्याला जखमी केले.

Tiger attack in Jankapur One bull killed, another injured | जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी

जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी

चंद्रपूर: नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून एका बैलाला ठार केले असून दुसऱ्याला जखमी केले. ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान, जखमी अवस्थेत बैल मालकाच्या घरी पोहोचल्याने ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, बसस्टाॅपजवळ वाघाचे नेहमीच दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

जनकापूर येथील सावरकर यांच्या शेत गट नं. १३० मध्ये मधुकर मंडलवार यांचे दोन बैल नेहमीप्रमाणे चरत होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने दोन्ही बैलांवर हल्ला केला. या घटनेमध्ये एक बैल ठार झाला. दरम्यान, दुसरा जखमी बैल सायंकाळी मालकाच्या घरी परतला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनरक्षक गुरूदेव नवघडे यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती वनविभागाकडे सादर केली. या परिसरात पट्टेदार वाघाचे नेहमीच दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Tiger attack in Jankapur One bull killed, another injured