कापड दुकानात हातबॉम्ब फेकून गोळीबार; एक कर्मचारी गंभीर

By राजेश भोजेकर | Updated: July 7, 2024 13:20 IST2024-07-07T13:20:34+5:302024-07-07T13:20:48+5:30

वर्षभरापूर्वी दुकान जाळले व १५ दिवसांपूर्वी झाला होता हल्ल्याचा प्रयत्न.

Throwing grenades into cloth shops An employee critical | कापड दुकानात हातबॉम्ब फेकून गोळीबार; एक कर्मचारी गंभीर

कापड दुकानात हातबॉम्ब फेकून गोळीबार; एक कर्मचारी गंभीर

राजेश भोजेकर/चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गोळीबाराला दोन दिवस होत नाही तोच बल्लारपुरातील गांधी चौकात मोतीलाल नावाच्या मालू यांच्या दुकानात रविवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास पेट्रोलबॉम्ब फेकून गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये दुकानातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती होताच बल्लारपूर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आहे अधिक तपास पोलीस करीत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी काही लोकांनी मोतीलाल नावाने ओळखले जाणारे मालू यांचे कापडाचे दुकान रात्रीला जाळले होते. यानंतर मागील दोन आठवड्यापूर्वी याच दुकानावर काही लोकांनी हल्ला करण्याच्या बेत आखला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो उधळला गेला. अशातच आता या दुकानात बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून तयार केलेला बॉम्ब फेकून गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या सर्व घटनाक्रमांची मालिका कशामुळे घडली याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामागे प्रेम प्रकरण असल्याचे पुढे येत आहे. मालू यांच्या मुलीचे एका गुप्ता नावाच्या मुलासोबत प्रेम प्रकरण होते. यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचल्याची चर्चा आहे. मात्र यानंतरही मालू यांच्यावर हल्ले सुरू झाल्याची चर्चा आहे. यातूनच मालू यांचे दुकान जाळण्यात आल्याची माहिती आहे. मागील 15 दिवसांपूर्वी मालू दुकानातून घरी जात असताना काही जणांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. आता त्यांच्या दुकानात काहींनी येऊन हातबॉम्ब टाकून गोळीबार केला. ही घटना जुन्या घटनांशी ताळमेळ घालणारी असल्याची चर्चा आहे. येत्या 10 तारखेला मालू यांच्या मुलीचे लग्न असल्याचे समजते. या लग्नाची तयारीचा भाग म्हणून मालू मंदिरात गेले होते. तर साखरकर नावाचा नोकर व मालू यांचा मुलगा दुकानातहोता, अशी माहिती आहे. गोळी नोकराला चाटून गेली.

Web Title: Throwing grenades into cloth shops An employee critical