जिल्ह्यातील ह्या नेत्यांकडे आहे बंदूक! जीवाला धोका असल्यास आमदारांना दिला जातो शस्त्र परवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:32 IST2025-01-22T14:31:59+5:302025-01-22T14:32:46+5:30
Chandrapur : दोन आमदारांकडे शस्त्र परवाना नाही

These leaders in the district have guns! MLAs are given weapons licenses if their lives are in danger
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकप्रतिनिधींचे राजकीय विरोधक अधिक असल्याने त्यांच्या जिवाला कायम धोका असल्याचे बोलले जाते. स्वतःच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील चार आमदारांकडे शस्त्र परवाना आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडेही शस्त्र परवाना आहे. वरोराचे आमदार करण देवतळे आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे मात्र शस्त्र परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे.
चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे शस्त्र परवाना आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शस्त्र परवाना विभागाकडे त्यांच्या नावाचा शस्त्र परवाना नाही. मात्र नागपूर किंवा अन्य ठिकाणाहून त्यांनी परवाना मिळविला असेल, असे बोलल्या जात आहे.
लोकप्रतिनिधी प्रत्येक कार्यक्रम, आंदोलन, मोर्चे, उपोषण आदी ठिकाणी जातात. त्यामुळे काही वेळा त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते. अशावेळी अचानक हल्ला झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी अनेक जण स्वतःजवळ शस्त्र बाळगतात. यासाठी प्रशासकीय परवानगी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर तो अर्ज चौकशीसाठी पोलिस प्रशासनाकडे जातो. चौकशी करून संबंधिताला शस्त्र परवान्याची गरज असेल तर परवानगी दिली जाते.
खासदारांकडे आहे बंदुकीचा परवाना
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्याकडेही शस्त्र परवाना होता. प्रतिभा धानोरकर वरोरा क्षेत्राच्या आमदार असताना त्यांच्याकडे शस्त्र परवाना नव्हता. मात्र आता त्यांनी प्रशासनाकडून शस्त्र परवाना मिळविला आहे.
अन्यथा होतो गुन्हा दाखल
जीवाला धोका असेल तर संबंधित नागरिकांना जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासनाकडून चौकशी करून शस्त्र बाळगण्याचा परवाना देतात. मात्र गावात दहशत निर्माण करण्यासाठी अवैधरित्या शस्त्र बाळगल्यास संबंधितावर गुन्हा दाखल होऊन जेलची हवा सुद्धा खावी लागले. शस्त्र बाळगताना अनेक नियमांचेही पालन करावे लागते. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागते. गर्दीच्या ठिकाणी जाताना खिशातील बंदूक दिसणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते.
लोकप्रतिनिधीसह अन्य नागरिकांकडेही परवाना
जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींकडे शस्त्र परवाना आहे. सोबतच जिल्ह्यातील काही उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिकांनीही आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी शस्त्र सोबत बाळगण्याची प्रशासनाकडे परवानगी घेतली आहे.
परवाना देताना मागविली जाते माहिती
पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती घेतली जाते. त्यानंतरच शस्त्र परवाना इच्छुकास दिला जातो.
अर्ज कोठे, कसा कराल ?
बंदूक परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील अर्ज अ भरून द्यावा लागतो. हा अर्ज पोलिस प्रशासनाकडे पाठवण्यात येतो. चौकशी करून पोलिस प्रमुखांकडे अहवाल देतात. तो अहवाल जिल्हा पोलिस प्रमुखांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी येतो.
तुम्हालाही मिळू शकतो प्रशासनाकडून परवाना
जीविताला धोका व वन्यप्राण्यांपासून संरक्षण या दोन कारणांमुळे शस्त्र परवाना दिला जातो. जिल्ह्यात सद्यस्थितीत अनेकांकडे शस्त्र परवाना आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये शस्त्र पोलिस विभागाकडे जमा करावे लागतात. यासाठी प्रशासन वेळोवेळी संबंधितांना सूचना देतात. काही वेळा परवाना जप्त केला जातो.
कोणत्या आमदारांकडे परवाना आहे ?
आ. सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र आ. किशोर जोरगेवार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. देवराव भोंगळे, राजुरा विधानसभा क्षेत्र
परवाना घेण्यासाठी जिल्हा प्रशासन देतात मंजुरी
जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. दरम्यान, अन्य प्रतिनिधींनी शस्त्र परवाना घेतला नाही. आम्ही जनतेचे सेवक, आम्हाला कोणीच काही करणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे