दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाची १२ दिवसांपासून हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:37 IST2024-10-03T14:32:59+5:302024-10-03T14:37:22+5:30
Chandrapur : टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम

The tiger that killed two has been on the run for 12 days
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यात मागील दोन महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली. नागरिकांच्या मागणीनुसार, वनविभागाने टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम राबवत आहे. मात्र, हा वाघ हुलकावणी देत असून जेरबंद करण्याचे वनविभागाचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहे.
तालुक्यात दोन वाघांनी धुमाकूळ घालत दोन महिन्यात सहा जणांचा बळी घेतला. हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला. ३० ऑक्टोबरला बोरचांदली शिवारात गुरे चराई करताना वाघाचे दर्शन होताच जीव वाचविण्याच्या आकांतात शैलेश कटकमवार याने नदीत उडी घेतली. त्यामुळे त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण असून शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून वनविभागाने तैनात केलेल्या रेस्क्यू टीमला हुलकावणी देत आहे. ही टीम वाघाच्या मागावर आहे. परिसरात अनेक ठिकाणी वनविभागाने कॅमेरे लावले.
तालुक्यातील जंगलात ११ वाघांचा संचार आहे. वनविभागाने वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केली.
"दोन दिवसांपूर्वी टी ८३ वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले. टी ८७ वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे."
-राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूल