चंद्रपुरातील दुर्लक्षित मोरवा विमानतळ अखेर हवाई नकाशावर! युवक-युवतींना पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:55 IST2025-02-21T10:55:10+5:302025-02-21T10:55:49+5:30
'फ्लाईंग क्लब'चे उदघाटन : देशातील उत्कृष्ट वैमानिक घडविण्याची संधी

The neglected Morwa Airport in Chandrapur is finally on the air map! A golden opportunity for pilot training for young men and women
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १९६७ मध्ये तयार झालेले चंद्रपुरातील मोरवा विमानतळ आजपर्यंत उपेक्षितच होते. व्हीआयपींचे छोटे विमान उत्तरण्यापुरते याचा वापर केला जायचा. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक वाढल्याने वैमानिक प्रशिक्षणासाठी आकाश मोकळे मिळत नव्हते. यावर पर्याय म्हणून गुरुवार (दि. २०) पासून येथील विमानतळावर 'पलाईंग क्लब' सुरू झाले. त्यामुळे दुर्लक्षित मोरवा विमानतळ आता केंद्रीय नागरी विमान वाहतुकीच्या नकाशावर आले आहे. विदर्भातील हे सहावे विमानतळ आहे. नागपूर, यवतमाळ, गोंदिया (बिरसी), अकोला (शिवनी) व अमरावती (बेलोरा) ही अन्य विमानतळे आहेत. चंद्रपुरातील 'फ्लाईंग क्लब'मुळे युवक-युवतींना अल्प खर्चात पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे खासदार तथा एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते १७२ आर. या प्रशिक्षण विमानाला हिरवा झेंडा दाखवून 'फ्लाईग क्लब'चे उड्डाण करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी., कैप्टन ऐजिल, उपविभागीय अधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते. चंद्रपूर विमानतळावर नागपूर फ्लाईंग क्लबचा अतिरिक्त बेस तयार करणे सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रास्ताविकात दिली. तहसीलदार विजय पवार यांनी संचालन केले.
१० आदिवासी विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड...
नागपूर फ्लाईंग क्लबअंतर्गत चंद्रपूर फ्लाइंग समितीच्या वतीने जिल्ह्यातील १२वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र विषयांसह) आदिवासी विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले होते. परीक्षेत १० विद्यार्थी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांच्या पायलट प्रशिक्षणाचा खर्च शासन करणार आहे.
असे आहे मोरवा विमानतळ...
२२ हेक्टर जागेत भोरवा विमानतळाची निर्मिती झाली. धावपट्टीची लांबी २०० मीटर व रुंदी २८ मीटर आहे. या विमानतळावर केवळ छोटेखानी विमान उतरू शकते. फ्लाईंग क्लबसाठी येथे चार सेस्ना विमाने ठेवता येतील, असे हँगर तयार झाले. सध्या दोन विमाने मिळाली, प्रशिक्षण देणारी कंपनी व नागपूर फ्लाईंग क्लब यांच्यात करार झाला. वैमानिक होण्यासाठी २०० तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करावे लागते. ही सुविधा मोस्वा विमानतळावर उपलब्ध झाली. सध्या दोन विमाने मिळाली आहेत.
दोन वर्षात उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र होईल : राजीव प्रताप रुडी
- भारतातील तरुण-तरुणी वैमानिक प्रशिक्षणासाठी बाहेर जातात. त्यासाठी कोटींचा खर्च येतो. कमी खर्चात प्रशिक्षण मिळावे, यासाठी फ्लाईंग क्लब सुरू करण्यात आले. भविष्यात येथे पर्यटकांसाठी एअरस्पोर्ट, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून आदींसाठी प्रयत्नशील राहू
- सर्व परवानग्या पूर्ण केल्यास दोन वर्षात हे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र होईल, अशी ग्वाही खासदार तथा एसे क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांनी फाकार परिषदेत दिली. आमदार मुनगंटीवार यांनी प्रकल्पासाठी कसा पाठपुरावा केला, याची माहिती दिली.