पर्यटनस्थळी अपघात झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:30 IST2025-03-17T14:29:08+5:302025-03-17T14:30:28+5:30
जिल्हाधिकारी : प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

Officials will be held responsible in case of accidents at tourist spots
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळी व धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जीवित व वित्तहानी होऊ नये, याकरिता सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान, पर्यटनस्थळी आवश्यक उपाययोजनांची संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख हे जबाबदार राहतील. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
घोडाझरी येथे अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून पर्यटनस्थळी उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, किल्ले, जंगल या ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्त्व विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (शहरी/ग्रामीण) व इतर आवश्यक यंत्रणा, सोबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. धबधबे, तलाव, नदी, डोंगराच्या कड्यांवर असलेले प्रेक्षणीय पॉइंट्स या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करावे, तिथे सूचना फलक लावावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची; अतिक्रमण काढा
पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रामुख्याने प्रशासनाची आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे जंगलामध्ये असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी जातात. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक लावावेत. अतिक्रमणे काढावीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटनासाठी वेळ निश्चित करून सूर्यास्तानंतर पर्यटक तेथे थांबणार नाहीत, याबाबत उपाययोजना करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
आदेश होणार निर्गमित
जलपर्यटन तसेच अन्य ठिकाणी त्या-त्या स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था, गिर्यारोहक, जिल्हा प्रशासनद्वारा प्रशिक्षित आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक इत्यादींची मदत घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी. त्या ठिकाणी प्रथमोपचार सुविधा असलेल्या अॅम्ब्युलन्सचीदेखील व्यवस्था करावी. उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहेत. त्यामुळे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांना अशा प्रत्येक पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत योग्य आदेश निर्गमित करावेत.
हे क्षेत्र पर्यटकांसाठी बंद
संभाव्य आपत्तीप्रवण, प्रेक्षणीय स्थळे ज्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नाही, अशी सर्व पर्यटनस्थळे, डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
५ जणांचा शनिवारी झालेल्या घोडाझरी येथील घटनेत मृत्यू
पर्यटकांसाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबतचे सूचना फलक लावण्यात येणार आहेत. जीवरक्षक, लाइफ जॅकेट्स, रेस्क्यू बोटी इत्यादी ठेवाव्यात, असेही आवाहन केले आहे.