दाखले हवे? आता फक्त QR कोड स्कॅन करा : पोंभूर्णा तहसीलचा नवा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:09 IST2025-08-07T15:07:47+5:302025-08-07T15:09:00+5:30
पोंभुर्णा तहसीलदारांचा अभिनव उपक्रम : नागरिकांचे हेलपाटे होणार बंद

Need certificates? Now just scan the QR code: Pombhurna Tehsil's new initiative
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णाः तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयाला असणाऱ्या सुट्टया व वेळेवर अधिकारी कर्मचारी उपस्थित न राहणे, यामुळे कार्यालयात आल्यानंतर दाखल्यांसाठी हेलपाटे व अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी कमी करण्यासाठी दाखले क्यूआर कोड उपक्रम या विशेष सुविधेचा तहसील कार्यालयाने ५ ऑगस्ट रोजी शुभारंभकेला आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता कार्यालयीन वेळेनंतर व सुटीच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही आवश्यक दाखले क्यूआर कोडच्या माध्यमातून मागवता येणार आहेत.
काही वेळा अधिकारी, कर्मचारी दौऱ्यावर असतात. कार्यालय बंद असते किंवा सुटीमुळे काम होऊ शकत नाही. दाखले मिळतील, यासाठी नागरिक दूरवरून आलेले असतात. कार्यालयाची वेळ संपली असेल किंवा दुसऱ्या दिवशी दाखला नोकरी किंवा प्रवेशासाठी अत्यावश्यक असेल तर तहसील कार्यालयात असलेल्या क्यूआर कोडवर दाखल्याची पावती पाठवल्यास तहसील कार्यालयातून शक्य तितक्या लवकर काम कार्यालयीन वेळेनंतर किंवा पूर्ण सुटीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्ती, सलग सुट्टया अशा प्रसंगी कोणतेही नुकसान होणार नाही, नागरिकांना महसूल सेवा अधिक सुलभ, वेळेत उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी व्यक्त केला.
...हे दाखले मिळणार
या उपक्रमाअंतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, भूमिहीन दाखला, शेतकरी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच महसूल विभागामार्फत दिले जाणारे इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहेत. दाखले क्यूआर कोड उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार मोहनिश शेलवटकर, सामाजिक कार्यकर्ते जगन येलके, वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार, नायब तहसीलदार रामकृष्ण उईके, दीपाली आत्राम, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले.
"आपले व्हॉटसअॅप ओपन केल्यानंतर वरील बाजूस तीन टिंब दिसतात, त्यावर दाबल्याने मेनू ओपन होईल. सर्वात खाली सेटिंगमध्ये जा. वर उजव्या बाजूस क्यूआर कोड चिन्ह दिसते, त्यावर क्लिक करा. स्कॅन कोडवर क्लिक करा व त्यावरील फ्लेक्स तहसील कार्यालय, पोंभुर्णा क्यूआर कोड स्कॅन करा. त्यावर पावती पाठवावी."
- मोहनिश शेलवटकर, तहसीलदार, पोंभुर्णा