Maharashtra Election 2019 ; सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला चंद्रपूरच्या विकासाचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:43+5:30
विकासाला प्राथमिकता देत कधीही राजकारण केले नाही. सबका साथ, सबका विकास या सुत्रानुसार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्या सहकार्याने या परिसराच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आपली विकासकामे जनतेसमोर ठेवून आम्ही मत मागत आहोत, असे सांगत विकासाला कौल देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra Election 2019 ; सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला चंद्रपूरच्या विकासाचा आराखडा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आहे. राज्यातही पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार सत्तारूढ होणार आहे. जर चंद्रपुरात आपण भाजपाच्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर हा मतदार संघ, हे शहर २५ वर्षे मागे जाईल. म्हणून मतदान विकासावरच करत या मतदार संघाच्या, शहराच्या विकासासाठी चंद्रपूर क्षेत्राचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
येथील गांधी चौकात आयोजित सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रपूर शहराचा विकासाचा आराखडा सादर करणारी ब्ल्यू प्रिंट सादर केली. यावेळी मंचावर भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, शिवसेनेचे अजय वैरागडे, रिपाइंचे राजु भगत, जयप्रकाश कांबळे, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, मधुसुदन रूंगठा, डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा गटनेते वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांची जंत्री जनतेसमोर ठेवली. या शहरात मोठया प्रमाणावर विकासकामे केली. विकासाला प्राथमिकता देत कधीही राजकारण केले नाही. सबका साथ, सबका विकास या सुत्रानुसार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्या सहकार्याने या परिसराच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आपली विकासकामे जनतेसमोर ठेवून आम्ही मत मागत आहोत, असे सांगत विकासाला कौल देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे डॉ. गोपाल मुंधडा यांचीही भाषणे झाली. चंद्र्रपूर विधानसभा क्षेत्राच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
विकासकामांची दीर्घ मालिका
गेल्या पाच वर्षात चंद्रपूर शहराने अभूतपूर्व असा विकास अनुभवला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, वनअकादमी, बाबा आमटे अभ्यासिका, एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बाबुपेठ स्टेडियम, बाबुपेठ उड्डाण पूल, दाताळा येथे पुलाचे बांधकाम, शहरातील दहा मोकळया जागांचा विकास, नियोजन भवन, कोषागार कार्यालय, दीक्षाभूमी परिसराचा विकास, प्रियदर्शिनी नाटयगृहाचे नुतनीकरण, प्रगतीपथावर असलेले बसस्थानकाचे आधुनिकीकरणाचे काम, शहरानजिक देशातील अत्याधुनिक सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारणारे कॅन्सर हॉस्पिटल अशी विकासकामांची दीर्घमालिका आम्ही या शहरात तयार केली आहे, अशी माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
निर्माणाधीन कामे पूर्णत्वाकडे
यासोबत लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क, कौशल्य विकास विद्यापीठ अर्थात स्कील युनिवर्सिटी, डिजिटल शाळांची निर्मिती, महिला बचतगटांच्या माध्यमातुन उत्पादीत वस्तुंच्या विक्रीसाठी मॉलचे बांधकाम, महाकाली मंदिर परिसर व विठ्ठल मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, ज्युबिली हायस्कूल परिसरात वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमचे बांधकाम, पोलीस ग्राऊंडचे अत्याधुनिकीकरण, सिंथेटीक ट्रॅकची निर्मिती, पाच नव्या अभ्यासिकांची निर्मिती, पंतप्रधान आवास योजना व घरकुलाशी संबंधित योजनांद्वारे प्रत्येक बेघराला हक्काचे घर, आझाद बगिच्याचे सौंदर्यीकरण, रामाळा तलाव सुशोभीकरण, पार्किंग प्लाझा आदी विकासकामे व निर्माणाधीन कामे पूर्णत्वास आणू, असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिले.