Maharashtra Election 2019 ; केवळ सहाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:58+5:30
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही.

Maharashtra Election 2019 ; केवळ सहाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात
सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आप, एपीआय, अखिल भारतीय मानवता पक्षाचा अपवाद वगळल्यास अन्य राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारीच दिली नाही. महिलांना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व सिद्ध करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ७१ पैकी केवळ सहा महिला उमेदवारांना संबंधीत पक्षांनी उमेदवारी दिली आहे. यातील दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून तारा काळे (अपक्ष), ब्रह्मपुरी मतदार संघातून पारोमिता गोस्वामी (आप), वरोरा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), चिमूर मतदार संघातून वनिता राऊत (अभामाप), चंद्रपूर मतदार संघातून अमरिता गोगूलवार (एपीआय) व राजुरा मतदार संघातून रेश्मा चव्हाण (अपक्ष) या सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. देशाचे राष्टÑपतीपद व पंतप्रधानपद महिलांनी यशस्वीरित्या भूषविले. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्टÑमंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्य करून गुणवत्तेचा ठसा उमटविला. राजकीय क्षेत्रासोबतच विज्ञान, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातही महिलांचे पाऊल पुढे आहे. संधी मिळाल्यानेच हे शक्य होऊ शकले. जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळींनी आता वेग धरला. शिक्षणाचे प्रमाणही वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची टक्के वाढताना दिसत आहे. परंतु, आरक्षणाच्या पलिकडे जाऊन कर्तृत्ववान महिलांना मुख्य राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्याची मानसिकता अजुनही तयार केली नाही.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्यामुळे महिला स्वत:हून राजकारणात येत नाहीत की प्रमुख राजकीय पक्ष त्यांना हेतुपूर्वक वंचित ठेवतात, असा प्रश्न सामाजिक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.