Maharashtra Election 2019 ; नव्या सारीपाटावर रंगतोय जुन्याच खेळाडूंचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:35+5:30
गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे अनिरूद्ध वनकर रिंगणात आहेत.

Maharashtra Election 2019 ; नव्या सारीपाटावर रंगतोय जुन्याच खेळाडूंचा डाव
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांवर दृष्टी टाकल्यास नव्या सारीपाटावर जुन्याच खेळाडूंचा डाव रंगणार असल्याचे चित्र आहे. चारही प्रमुख उमेदवार हे मागील २०१४ च्याच निवडणुकीतील असले तरी पाच वर्षात परिस्थिती फार बदलली असल्याने यावेळी येथून कोण विजयी होईल याची चर्चा आपापल्यापरीने रंगविली जात आहे.
गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे अनिरूद्ध वनकर रिंगणात आहेत. काँग्रेसच्या एबी फार्मच्या महानाट्यानंतर महेश मेंढे हे काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झालेत. परंतु त्यांच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्ते अद्याप ताकदीने उतरल्याचे दिसत नाही. किशोर जोरगेवार मागील पाच वर्षांपासून जनसामान्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलने करून सतत चर्चेत होते. आता स्थानिक उमेदवार म्हणून ते मते मागत आहेत. केंद्रात राज्यात व पालिकेत भाजपचे सरकार आणि मजबूत संघटन, यासोबतच सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात विकासकामे केली. यात चंद्रपूर विधानसभा मतदार संघात ही विकासकामे मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहेत. ही बाब भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्यासाठी जमेची ठरत आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी छोट्या छोट्या सतरा पगड जाती समुहांना साद घालून वंचित आघाडीची मोट बांधली. यातील बौद्ध समाज हा पायाभूत मतदार झाल्याने आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावर स्वार होऊन अनिरूद्ध वनकर हे वेगवेगळे समीकरण मांडत आहे.
किशोर जोरगेवारही बौद्ध-मुस्लीम मतदारांना वळविण्याच्या प्रयत्नात आहेत. महेश मेंढे यांच्यासमोर मात्र काँग्रेसचे परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.
काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया यांची भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद मागितल्याचे विशेष सूत्रांकडून कळते. एकंदरीत प्रथमदर्शनी दुरंगी दिसणारी येथील लढत वंचित फॅक्टरमुळे रंगतदार होण्याची शक्यता आहे. काही दिवसात परिस्थिती काय वळण घेते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.