Maharashtra Election 2019 ; शक्तीप्रदर्शनाद्वारे उमेदवारांचे नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येत्या २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसच्या ...

Maharashtra Election 2019 ; शक्तीप्रदर्शनाद्वारे उमेदवारांचे नामांकन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसच्या प्रतिभा सुरेश धानोरकर व स्वभापचे अॅड. वामनराव चटप यांच्यासह १२ जणांनी गुरुवारी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या चारही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी मिरवणुकीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या रॅली व शक्तीप्रदर्शनामुळे चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वरोरा व राजुरा शहर दणाणून गेले होते. नागरिकही उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.
शक्तीप्रदर्शनाद्वारे श्यामकुळेंचा अर्ज दाखल
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार नाना श्यामकुळे यांनी गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो भाजपा कार्यकर्ते व नागरिक स्वयंस्फूर्तीने येथील शिवाजी चौकात एकत्र झाले. त्यानंतर शिवाजी चौकातून विराट रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व उमेदवार नाना श्यामकुळे हे एका जिप्सीमध्ये उभे होते. ही रॅली बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. नागरिकांना स्वत: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जिप्सीवरून अभिवादन करीत होते.