५२ हजार ३३९ मिळकतींच्या पीआर कार्डने संपणार जमिनीचे तंटे; नव तंत्रज्ञानामुळे आली अचुकता
By राजेश मडावी | Updated: April 21, 2023 18:09 IST2023-04-21T18:05:00+5:302023-04-21T18:09:04+5:30
जिल्ह्यातील ४१४ गावांची जीआय चौकशी पूर्ण

५२ हजार ३३९ मिळकतींच्या पीआर कार्डने संपणार जमिनीचे तंटे; नव तंत्रज्ञानामुळे आली अचुकता
चंद्रपूर : अत्याधुनिक ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करून ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचे मिळकत प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याचे अभियान जिल्ह्यात सुरू आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ५२ हजार ३३९ ग्रामस्थांच्या मिळकत पत्रिका ऑनलाइन तयार झाल्या आहेत. जमिनीच्या हक्कावरून निर्माण होणारे भांडणतंटे मिटविण्यासाठी पत्रिका महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा भूमिअभिलेख विभागाने केला आहे.
भूमीअभिलेख विभागातील सर्वेक्षण मोजणीपासून तर दैनंदिन कामकाज करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचाच भाग म्हणून जमीन मोजणीच्या पारंपरिक पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आले. अत्याधुनिक ड्रोनच्या साह्याने केलेली मोजणी अचूक ठरत असून, प्रशासकीय गतिमानतेसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्हा भूमिअभिलेख विभागाने ग्रामपंचायतांतर्गत मिळकतींचे मिळकत प्रमाणपत्र (पीआर कार्ड) देण्याचे अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत ५२ हजार ३३९ ग्रामस्थांच्या मिळकत पत्रिका ऑनलाइन तयार करण्यात आल्या. त्या महाभूमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
१३३८ गावांचे ड्रोन सर्वेक्षण
सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एसओआय) माध्यमातून ड्रोनच्या साह्याने नकाशे घेण्याचे काम सुरू आहे. १३३८ गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले, तर ४१४ गावांचे जी. टी. आणि चौकशी पूर्ण करण्यात आली आहे.