घोडाझरी पर्यटन बंदच; नागपूरच्या कार्यालयाकडून परवानगी देण्यासाठी विलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:02 IST2024-12-10T14:00:32+5:302024-12-10T14:02:34+5:30
चार महिन्यांपासून घोडाझरी पर्यटन बंदच: पर्यटक आल्यापावलीच जाताहेत परत

Ghodazari tourism closed; Delay in giving permission from Nagpur office
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : एका दिवसाच्या पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेले घोडाझरी पर्यटनस्थळ गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. सिंदेवाही येथील कार्यालयाचा निविदेच्या परवानगीसाठी नागपूर येथील कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, नागपूरच्या कार्यालयाकडून परवानगी देण्यासाठी कमालीचा विलंब होत आहे.
या भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाचे बांधकाम सुरू केले आणि तलावाचे हे बांधकाम १९२३ ला पूर्ण झाले. तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि एका बाजूला कृत्रिम बांध असे या तलावाचे स्वरूप आहे.
सिंचनासोबतच या तलावाचा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. नव्हे तर गेल्या काही वर्षात हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणूनच प्रसिद्धीस आले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील पर्यटक या पर्यटनस्थळास वर्षभर भेट देत असतात. पूर्वी शासनाच्या पाटबंधारे विभागाकडे या पर्यटनस्थळाचे संचालन होते. मात्र, काही वर्षांपूर्वी शासनाने हे पर्यटनस्थळ खासगी व्यवस्थापनास भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते. या व्यवस्थापनाने याठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने ज्या काही सोयी आवश्यक आहेत, त्या विविध सोयी उपलब्ध करून हे पर्यटनस्थळ चांगलेच नावारूपास आणले. म्हणूनच पूर्व विदर्भातील पर्यटक, शाळा महाविद्यालयांच्या सहली घोडाझरी येथे एका दिवसाच्या पर्यटनासाठी येत असत.
आता या व्यवस्थापनाची "लीज" संपल्याने गेल्या चार महिन्यांपासून घोडाझरी पर्यटनस्थळ बंद आहे. लीज संपताच या पर्यटनस्थळाची नव्याने निविदा काढण्यासाठी नागपूर येथील मुख्य अभियंता यांच्याकडे परवानगी मागितली आणि या परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, नागपूरचे कार्यालय परवानगी का देत नाही, हे एक कोडेच आहे.
अभयारण्याचेही भिजत घोंगडे
महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी घोडाझरी अभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड, तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३.८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले. मात्र, अभयारण्याच्या दृष्टीने येथे कोणत्याही सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
पर्यटकांचा हिरमोड
गेल्या चार महिन्यांपासून घोडाझरी पर्यटनस्थळ बंद असल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. अनेक पर्यटकांना घोडाझरी बंद असल्याची माहिती नसल्याने पर्यटकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
"जुन्या व्यवस्थापनाची लीज संपल्यानंतर नवीन निविदेच्या परवानगीसाठी आमच्या कार्यालयाकडून नागपूरच्या मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, नागपूरच्या कार्यालयाकडून अद्यापही मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे निविदा काढता येत नाही."
- दिलीप मदनकर, अभियंता, घोडाझरी