वर्धा-पैनगंगा नदी पात्रात आढळले स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:30 IST2025-04-18T12:28:53+5:302025-04-18T12:30:21+5:30
Chandrapur : २५ हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म असल्याचा सुरेश चोपणे यांचा दावा

Fossils of Stegodon elephant found in Wardha-Painganga river basin
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुमारे २५ हजार ते १२ हजार वर्षांदरम्यान विदर्भात लुप्त झालेल्या विशालकाय दुर्मीळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर तालुक्यातील वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात आढळले, असा दावा चंद्रपूरचे भूगर्भ अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी गुरुवारी (दि. १७) केला आहे. महाराष्ट्रात प्लेईस्टोसीन काळातील हत्तीचे मिळालेले हे दुर्मीळ जीवाश्म आहे. जीवाश्मसोबत पाषाणयुगीन अवजारेही मिळाली. दुर्मीळ हत्तींचे जीवाश्म व पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी आढळणे, हे अतिशय महत्त्वाचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रातील ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि २५ हजार वर्षांदरम्यान विदर्भात वास्तव्य असलेल्या स्टेगोडॉन गणेश हत्तीचे आहेत. हत्तींच्या सुळ्यांवरून हे निरीक्षण विदेशी संशोधक व वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलाजीचे निवृत्त प्रा. अविनाश नंदा यांनी नोंदविले. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षांपूर्वी विलुप्त झाले. आजच्या आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. या ठिकाणी एलेफास नामाडिकस या लुप्त झालेल्या हत्तीचे सदृश डोकेसुद्धा आढळले.
या जीवाश्मांचे सखोल विश्लेषण करण्याची गरज आहे. प्लेईस्टोसीन २ लाख ते ११ हजार ७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे व पाषाणयुगीन मानवाचे वास्तव्य होते. शेवटच्या कालखंडात हिमयुग होते. हे हिमयुग वितळल्यानंतर भारतात महापूर आला. त्यामुळे पुरातील गाळात सजीवांचे पुरावे सापडतात, असा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे.
यापूर्वी आढळलेले जीवाश्म
२०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली होती. वर्धा नदीवरील हे सर्वेक्षण २०२४ मध्ये पूर्ण झाले. आतापर्यंत आढळलेले सर्व जीवाश्म चंद्रपुरातील घरीच स्थापन केलेल्या रॉक म्युझियममध्ये ठेवली. राज्यातील भूगोल, भूशास्त्र, जीवशास्त्र व विज्ञान शाखेचे विद्यार्थी तसेच संशोधकांनी या जीवाश्मांचा अभ्यास करावा, असे आवाहन प्रा. चोपणे यांनी केले आहे.
"महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, पुणे व सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगणात आशियाई हत्तींची जीवाश्मे मिळाली. परंतु, स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे आढळण्याची महाराष्ट्रातील पहिली घटना आहे."
- प्रा. सुरेश चोपणे, खगोल व भूगर्भअभ्यासक, चंद्रपूर