'त्या' बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 13:23 IST2022-08-25T13:20:39+5:302022-08-25T13:23:11+5:30
विसापूर गावालगत बिबट्या अडकला पिंजऱ्यात

'त्या' बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास
विसापूर (चंद्रपूर) : मध्य चांदा वनविभागातील बल्लारशाह वन परिक्षेत्रातील विसापूर गावाच्या जुन्या औष्णिक वीज केंद्राच्या पडक्या वसाहतीमध्ये मागील एक वर्षापासून बिबट्याचा वावर होता. सोमवारी सायंकाळी बिबट्याने विसापूर गावातील प्रल्हाद मशाखेत्री यांची बकरी ठार केली. बल्लारपूर वनविभागाने चार पिंजरे लावले होते. बुधवारी सायंकाळी ८ च्या दरम्यान बिबट पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
बल्लारपूर वन परिक्षेत्रात जुन्या औष्णिक वीज केंद्राची पडकी वसाहत आहे. येथे झुडपे वाढली आहे. काही दिवसाअगोदर येथे बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता बळावली होती. मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी शासनाकडे बिबट जेरबंद करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच त्यांनी बिबट जेरबंद करण्याचे निर्देश बल्लारपूर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिले.
बल्लारशाह वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने चार ठिकाणी ट्रप कॅमेरे व चार पिंजरे लावले होते. बुधवारी सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला. ही कारवाई चंद्रपूर मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, विभागीय वनअधिकारी सुहास बढेकर यांच्या नेतृत्वात मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, सहायक वन संरक्षक श्रीकांत पवार, व्याघ्र वन्यजीव रक्षक मुकेश भांधककर, बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप जांभुळे यांच्यामार्फत करण्यात आली.