अखेर ऐतिहासिक सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:39 IST2025-04-17T16:37:31+5:302025-04-17T16:39:16+5:30
प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव जाहीर : नागरिकांना दोन महिन्यांच्या आत नोंदविता येणार हरकती

Finally, the historic Sarai building has been granted the status of a state protected monument!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील इंग्रजकालीन ऐतिहासिक सराय (धर्मशाळा) इमारत वाचविण्यासाठी इतिहासप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर राज्य शासनाने मंगळवारी (दि. १५) राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्राथमिक अधिसूचना जाहीर केली. अधिसूचना जाहीर झाल्यापासून नागरिकांना दोन महिन्यांच्या आत याबाबत हरकती दाखल करता येणार आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालकांकडून या अधिसूचनेची प्रत संबंधित सराई स्मारकाजवळ लावावी, अशी सूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी दिली आहे.
स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली इंग्रजकालीन 'सराय' जीर्ण होत आहे. या इमारतीची मालकी चंद्रपूर महानगर पालिकेकडे आहे. या जागेवर व्यावसायिक संकुल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १०० वर्षे जुन्या इमारतीचे जतन करण्यासाठी चंद्रपुरातील अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.
२३ हजार ७०० रुपयांत उभी झाली होती, इंग्रजांच्या काळात चंद्रपुरातील सराई इमारत. राज्य शासनाने अखेर मंगळवारी (दि. १५) शासन निर्णय जारी केला. त्यामध्ये सराय धर्मशाळेला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याचा प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्तावही जाहीर केला आहे.
राष्ट्रीय नेत्यांनी केला होता मुक्काम
१९ फेब्रुवारी १९२७ रोजी चंद्रपूर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वनाथ दीक्षित ऊर्फ बाबा पाटील आणि गृहमंत्री ई. राघवेंद्र यांच्या हस्ते उद्घाटन झाले. इमारतीसाठी दुर्मीळ सागवान लाकडाचा वापर झाला. बांधकामासाठी २३ हजार १०७ रुपये खर्च आला होता. महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, बॅरिस्टर युसुफ शरीफ, बॅरिस्टर अभ्यंकर आदी राष्ट्रीय नेत्यांनी या इमारतीत मुक्काम केल्याचा इतिहास आहे.
उच्च न्यायालयातील लढ्याला मिळाले यश
या संघर्षाची न्यायालयाने सकारात्मक दखल घेतली आहे. ही इमारत स्मारक करण्याच्या दृष्टीने नागपूर खंडपीठाने याबाबत पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना १५ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील सहायक संचालक मयूरेश खडके यांनीदेखील १८ डिसेंबरला राज्याचे संचालकांना सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषणा करत अधिसूचनेसाठी प्रस्ताव
पाठविण्याबाबतचे पत्र दिले होते.
असा आहे सराय इमारतीचा इतिहास
चंद्रपूर शहरात येणारे वाटसरू व महत्त्वाच्या लोकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष माधवराव चेंडके यांच्या कार्यकाळात सराय बांधण्याची संकल्पना समोर आली. तेव्हा अनेकांनी लोकवर्गणी दिली. २ ऑक्टोबर १९२१ रोजी पायाभरणी झाली. तत्कालीन उपायुक्त जे. पी. बेहर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सहा वर्षांनी इमारत पूर्ण झाली.