शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:42 IST2025-01-22T13:41:41+5:302025-01-22T13:42:53+5:30

शेतकरी हैराण : ४३ आधारभूत केंद्रांतून केली धान विक्री

Farmers owed Rs 90 crore; only Rs 5 crore 19 lakh received so far | शेतकऱ्यांचे ९० कोटी थकविले ; आतापर्यंत मिळाले फक्त ५ कोटी १९ लाख रूपये

Farmers owed Rs 90 crore; only Rs 5 crore 19 lakh received so far

घनश्याम नवघडे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागभीड :
पणन महासंघाने खरेदी केलेल्या धानाचे तब्बल ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपयांचे चुकारे शासनाने थकविले. चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. तूर्तास हंगामासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हैराण झाले आहेत.


जिल्ह्यातील नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यातील सर्वच तालुक्यांची अर्थव्यवस्था धान पिकावरच अवलंबून आहे. साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक हाती येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर जातात. सध्या जिल्ह्यात पणन महासंघ व आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रांमार्फत धानाची खरेदी केली जात आहे. पणन महासंघ संचालन करीत असलेले ४३ आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. दोन महिन्यांपासून धान खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे चुकारे देण्यात आले नाही. 


आदिवासी महामंडळाचे १८ केंद्र 
पणन महासंघाप्रमाणेच जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडूनही १८ आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे. महामंडळाने धानाचे चुकारे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली. मात्र, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आदिवासी विकास महामंडळाकडे किती चुकारे अडले आहेत, याबाबत संपर्क साधला पण याचा तपशील मिळू शकला नाही.


फक्त ५ कोटी १९ लाख मिळाले 
पणन महासंघाच्या २१ जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, २ हजार ३०० रुपये खरेदी दरानुसार या धानाची किंमत २५ कोटी १३ लाख २७ हजार ४९५ रुपये आहे. मात्र, आतापर्यंत शासनाकडून केवळ ५ कोटी १९ लाख ९८ हजार अदा करण्यात आले. शासनाकडे ८९ कोटी ९३ लाख २९ हजार ४८६ रुपये शिल्लक आहेत.


काहींना रुपयाही मिळाला नाही 
काही शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच धानाची विक्री केली; पण त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हंगामावर झालेल्या खर्चाची २ परतफेड धान विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून करायची आहे. कोणाला हंगामासाठी गहाण केलेले सोने सोडवायचे तर कुणाला सोसायटी व सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडायचे आहे.


"जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून चुकाऱ्यासंदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे. चुकारे त्वरित मिळावेत, यासाठी आमच्या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे." 
- व्ही. एस. तिवाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, चंद्रपूर


"दीड महिन्यापूर्वी थान विकले. हंगामावर झालेल्या खर्चाची रक्कम परतफेड करायची आहे; पण अद्याप एकही पैसा मिळाला नाही." 
- दिवाकर रामदास कुळे, शेतकरी, मिथूर

Web Title: Farmers owed Rs 90 crore; only Rs 5 crore 19 lakh received so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.