चंद्रपूरमध्ये बनावट हॉटेल्सचा भंडाफोड; ८ मालकांविरोधात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:30 IST2025-07-21T12:23:53+5:302025-07-21T12:30:21+5:30
'ब्रँड'ची फसवणूक : मान्यता न घेताच सुरू होता व्यवसाय

Fake hotels busted in Chandrapur; Cases registered against 8 owners
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात अनेक हॉटेल्स आणि लॉज मालकांनी ओयो रूम्स या ब्रँडचा लोगो आणि नाव कंपनीच्या संमतीशिवाय वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओयोचे ट्रेडमार्क उल्लंघन करण्यात आल्याने अहमदाबादमधील नोडल अधिकारी मनोज माणिक पाटील यांनी १८ जुलैला शहर पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी धाडसत्र राबविले असून आठ हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्य हॉटेलची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मोठे घबाड उजेडात येण्याची शक्यता आहे.
शहरातील विविध भागांतील १५ हॉटेल्स-लॉजमध्ये ओयोचा बनावट लोगो वापर करून ग्राहकांना फसवण्यात येत होते. या प्रकरणी पोलिसांनी आठ प्रतिष्ठानांवर धाड टाकून संबंधित मालकांवर कारवाई केली आहे. या हॉटेलच्या मालकांवर कलम ३४५ (३), ३४७ (१) भारतीय दंडसंहिता २०२३ अंतर्गत सहकलम १०३ आणि १०४, तसेच ट्रेडमार्क अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरचे ठाणेदार पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी केली.
लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला होता प्रश्न
चंद्रपूरात गल्लोगल्ली हॉटेल सुरू झाले असून यामध्ये ओयोच्या नावाखाली अनुचित प्रकार घडत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी काही महिन्यापूर्वीच म्हटले होते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला पत्र दिले होते. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ओयो संदर्भात मुद्दा उपस्थित करून याकडे लक्ष वेधले. तर गावाच्या बाहेर असलेल्या या हॉटेलमध्ये चालतात तरी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता