चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी! ब्रह्मपुरी नवीन जिल्हा व्हावा का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:20 IST2025-01-18T15:19:46+5:302025-01-18T15:20:45+5:30
नागरिकांना प्रतीक्षाच : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही?

Demand for division of Chandrapur district! Should Brahmapuri be a new district?
रवी रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : सध्या सोशल मीडियावर २१ नवीन जिल्हे होण्याच्या मागणीला उधाण आले आहे. या मागणीला शासन स्तरावर कितपत सत्यता आहे, हे जरी कळले नसले तरी ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. ब्रह्मपुरी परिसरातील नागरिकांनी वारंवार ही मागणी रेटून धरली आहे. मात्र अजूनही शासन याकडे सकारात्मक बघत नसल्याने या मागणीचे भिजत घोंगडेच आहे.
१९८२ पासून ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी केली जात आहे. गडचिरोली जिल्हा होताना ब्रह्मपुरीचे नाव अग्रक्रमावर होते. परंतु रात्री नाव बदलून गडचिरोली जिल्हा नव्याने घोषित करण्यात आला होता. ब्रह्मपुरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना शासकीय व निमशासकीय कामकाजाकरिता मोठ्या पल्ल्याचा सामना करावा लागत आहे. या गैरसोयीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे व नव्याने ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करण्यात यावा, ही मागणी गेली अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. या मागणीसाठी प्रसंगी आंदोलने चक्काजाम, ब्रह्मपुरी बंद, मुंडण आंदोलन, अशा प्रकारचे आंदोलन करूनसुद्धा शासन स्तरावर कुठल्याही हालचाली झाल्या नाही. प्रसंगी या साऱ्या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकर निराश झाले. ६० किमी अंतरावर आहे ब्रह्मपुरीपासून गडचिरोली शहर. त्यामुळे जिल्हा न झाल्यास ब्रह्मपुरी गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करावे.
ब्रह्मपुरी सर्व प्रकारे जिल्ह्यासाठी अनुकूल
ब्रह्मपुरी हे ठिकाण शैक्षणिक, आरोग्य विषयक, व्यापार, दळणवळण, इमारती, खुली जागा या सर्व वैशिष्ट्याने जिल्ह्यासाठी सज्ज आहे. तरी ब्रह्मपुरीला वारंवार जिल्ह्याच्या यादीतून वगळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ब्रह्मपुरीपेक्षा छोट्या शहराला यापूर्वी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र ब्रह्मपुरीवर राजकीय उदासीनता दिसून येत आहे.
जिल्ह्यासाठी प्रतीक्षा अजूनही कायम
ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी अजूनही प्रतीक्षा कायम आहे. येथील काही नागरिकांनी एकत्र येऊन कृती समिती निर्माण करून पुन्हा लढा देण्याविषयी चर्चा केल्या जात आहे. अभी नहीं तो कभी नही, असाही नारा दिला जात आहे. सोशल मीडियावरची पोस्ट पाहून पुन्हा ब्रह्मपुरीकर सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. जुन्या मागणीला नवीन ताकद देऊन जिल्ह्यासाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार जिल्हा निर्माण कृती समितीने केला आहे.
- ब्रह्मपुरी जिल्हा जर होत नसेल तर ब्रह्मपुरी तालुका हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
- ब्रह्मपुरीपासून चंद्रपूर १२५ 3 किलोमीटर तर गडचिरोली फक्त ६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने गडचिरोली हे ठिकाण सोयीचे आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी लागणारा वेळ व गडचिरोलीला जाण्यासाठी लागणारा वेळ याच्यात निम्मा वेळ लागत असून वेळ व पैशाची ही बचत होते.
- ब्रह्मपुरी तालुक्याला गडचिरोलीत समाविष्ट केल्यास नागरिकांना समाधान वाटेल.