भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 18:05 IST2022-11-01T17:59:44+5:302022-11-01T18:05:15+5:30
मौजा भटाळी हे गाव वेकोलि उत्खननामुळे बाधित असल्यामुळे त्वरित पुनर्वसन व उर्वरित शेतजमीन संपादित करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे.

भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी नागपूर येथे आयोजित बैठकीत दिले.
सेमिनरी हिल्स येथील वनसभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक (वेकोलि) मनोज कुमार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विशाल कुमार मेश्राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच मौजा पायली, भटाळी गावाचे सरपंच व नागरिक उपस्थित होते.
मौजा भटाळी हे गाव वेकोलि उत्खननामुळे बाधित असल्यामुळे त्वरित पुनर्वसन व उर्वरित शेतजमीन संपादित करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे. वेकोलि व जिल्हा प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करावी व यासाठी आवश्यक तो सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करावा, असे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.