शेळ्या चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार; नागभीड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 18:31 IST2022-10-17T18:27:53+5:302022-10-17T18:31:16+5:30
परिसरात दहशतीचे वातावरण

शेळ्या चारायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार; नागभीड तालुक्यातील घटना
नागभीड (चंद्रपूर) : शेळ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पान्होळी येथे कक्ष क्रमांक ६६९ मध्ये घडली. या घटनेने परिसरातील गावातील शेतकरी आणि गुराख्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
सत्यवान पंढरी मेश्राम (६०) असे मृतक गुराख्याचे नाव आहे. स्वत:च्या शेळ्या चारण्यासाठी तो गावानजीक असलेल्या शिवारात गेला होता. शेळ्या चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने सत्यवानवर हल्ला करून जागीच ठार केले. नेहमीप्रमाणे शेळ्या घरी आल्या. मात्र, सत्यवान घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांनी व गावकऱ्यांनी शिवारात जाऊन पाहणी केली असता, सत्यवानचा मृतदेहच दिसला.
घटनेची लागलीच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.