बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची विक्री जोरात ! कृषी विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:35 IST2025-02-28T14:33:59+5:302025-02-28T14:35:06+5:30
मूल तालुक्यात : शेतकऱ्यांनो सावधान ! बियाण्यांमुळे शेतजमीन होते नापीक

Banned BT seeds are selling strongly! Neglect of Agriculture Department
धनराज रामटेके
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मागील वर्षी अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे दुःख विसरून आता शेतकरी बांधव येणाऱ्या खरिपाच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. दरम्यान, शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बी-बियाण्यांची खरेदी करून आतापासूनच घरी जमा करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत शासनाची बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची विक्री जोरात सुरू असून, याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
चोर बिटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाण्यांवर बंदी घातली आहे. मात्र, तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे जिल्ह्यात आणली जात आहेत. कृषी विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याने या बियाण्यांची खुलेआम विक्री जिल्हाभरात सुरू आहे. मागील काही वर्षापासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तणनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात. तणनाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र, चोर बिटी या कापसाची लागवड केल्यास तणनाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बिटीची लागवड करून शेतकरी तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.
कमी जागेत जास्त उत्पादनाचे आमिष
मूल तालुक्यातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यातील बेंबाळ, जुनासुर्ला, गडीसुर्ला, नांदगाव या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. मात्र, यावर्षी कापसाच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी मात्र कमालीचे हैराण झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याच्या आमिषेपोटी प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांच्या खरेदीला बळी पडत आहे. त्याचाच फायदा घेत परिसरातील नफाखोर व्यापारी तसेच दलाल घेताना दिसून येत आहेत. मात्र, याबाबत कृषी विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
तणनाशके घातकच
अतिशय घातक असलेली तणनाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बिटी या बियाण्यांवर बंदी घातली आहे. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र, तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात आणले जात आहेत. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कृषी अधिकारी व कृषी केंद्र चालकांची मिलीभगत
कृषी केंद्रांमध्ये खुलेआम चोर बिटी बियाण्यांची विक्री होत असताना कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. यावरून कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व कृषी केंद्र संचालक यांच्यामध्ये मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाचे अधिकारी एकाही कृषी केंद्रांवर कारवाई करीत नाही. याची पक्की खातरजमा येथील कृषी केंद्र संचालकांना झाली असल्याने चोर बिटी बियाणांचा काळा बाजार वाढला आहे. एकूण लागवडीच्या सुमारे ८० टक्के बियाणे चोर बिटी वापरले जात आहेत. मात्र, कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
८० % कृषी विभागाने बियाणे जप्त करावे
बियाणे चोर बिटी वापरले जात आहेत. तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित असलेले हे बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात आणले जात आहेत. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.