..अन् डोळ्यादेखत तीन लाखांची बॅग पाण्यात वाहून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 15:10 IST2022-07-28T14:53:14+5:302022-07-28T15:10:40+5:30
पाण्याचा प्रवाह जास्त असतानाही एकाने शहाणपणा करत दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीला अटकवलेली तीन लाख रुपये असलेली बॅग पाण्यात वाहून गेली.

..अन् डोळ्यादेखत तीन लाखांची बॅग पाण्यात वाहून गेली
वरोरा (चंद्रपूर) : मोठ्या प्रमाणात पाणी असताना त्याने दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दुचाकी पाण्यात घसरली आणि तो दुचाकीसह पाण्यात पडला. सुदैवाने त्याला काही झाले नाही. मात्र, दुचाकी वाहनाला लावलेली तीन लाख रुपये असलेली बॅग पाण्यात वाहत गेली. त्याने आरडाओरडा करून बॅग पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु अवघ्या काही सेकंदांतच त्याच्या डोळ्यादेखत ती बॅग दिसेनाशी झाली. ही घटना शहरातील बोर्डा पुलाखाली मंगळवारी सायंकाळी घडली.
वरोरा शहरात प्रवेश करण्याकरिता उड्डाणपूल तसेच आनंदवन व बोर्डा रस्त्यालगत रेल्वेचे दोन बोगदे आहेत. नागरिक शहरात किंवा शहराबाहेर जाण्याकरिता या दोन्ही बोगद्यांचा उपयोग करतात. पावसाळ्याच्या दिवसात या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते.
दोन दिवसांपूर्वी बोर्डा रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. एका इसमाने बॅगमध्ये तीन लाख रुपये दुचाकीला समोर अडकवून ठेवले व पाण्यामधून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. पाणी अधिक असल्याने दुचाकीसह तो व्यक्ती पाण्यात पडला. तीन लाख रुपये असलेली बॅग पाण्यात वाहत निघाली. त्याने ओरडताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु ती बॅग सापडली नाही.