चंद्रपुरातील फुटलेले ‘ते’ जुने प्रभाग पुन्हा जुळणार? ५१ आक्षेपकर्त्यांच्या २ जुलैकडे नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 11:01 IST2022-06-29T10:54:01+5:302022-06-29T11:01:34+5:30
जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांमुळे बऱ्याच जणांची पंचाईत झाली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते.

चंद्रपुरातील फुटलेले ‘ते’ जुने प्रभाग पुन्हा जुळणार? ५१ आक्षेपकर्त्यांच्या २ जुलैकडे नजरा
चंद्रपूर : मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांमुळे बऱ्याच जणांची पंचाईत झाली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते. त्यावर सोमवारी नागपूर एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. आता २ जुलैला अंतिम प्रभाग जाहीर होणार असल्याने ते पुटलेले प्रभाग पुन्हा जुळणार काय, याकडे आक्षेपकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
चंद्रपुरातील प्रभागांची पुनर्रचना होणार, हे गृहीत धरूनच सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी आपापल्या क्षमतेनुसार विकासकामे केली होती. आपल्या वाट्याला आलेल्या निधीचा त्या-त्या वाॅर्डांत विनियोग केला. मात्र, नवीन २६ प्रभागांच्या पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होताच अनेकांचे अवसान गळाले. विकासकामे केलेला वाॅर्ड आपल्या प्रभागातच येत नसल्याचे पाहून पराजयाची धडकी भरली. शहरातील बहुतांश प्रभागांत मोठे फेरबदल झाले. त्यामुळे मनपात राजकारण करणारे माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी या प्रारूप आराखड्यावर आक्षेप नोंदविले. २२ जून २०२२ पर्यंत मनपाकडे ५१ जणांच्या हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यावर नागपुरात सोमवारी सुनावणी झाली.
प्रारूप प्रभागावर कुणी घेतला आक्षेप?
माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, संजय कंचर्लावार यांच्या प्रभागात बरेच बदल झाल्याने त्यांनी आक्षेप नोंदविला. याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका सुनीता लोढिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय वैद्य, शिवसेनेच्या आखरे यांनीही त्यांचे आक्षेप व हरकती मांडल्या.
कुणाकडे मांडल्या हरकती?
चंद्रपुरातील २५ प्रारूप प्रभागांवर नागरिकांचे आक्षेप नोंदवून सुनावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने नागपूर एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती केली. त्यांच्यासमोर ५१ जणांच्या आक्षेप व हरकतींवर सुनावणी झाली. अंतिम आराखडा २ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध होईल. यावेळी रोहयो नागपूरच्या उपायुक्त राजलक्ष्मी शाह, चंद्रपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विपिन पालिवाल यांच्यासह अधिकारी व अभियंत्यांची उपस्थिती होती.