Tata Motors Shares: टाटा मोटर्सचा शेअर १७ जून रोजी कामकाजादरम्यान १ टक्क्यांहून अधिक घसरून ६७७ रुपयांवर आला. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे कंपनीची ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँड रोव्हरला (जेएलआर) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जी-७ परिषदेदरम्यान झालेल्या या करारानुसार ब्रिटनमधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रवासी वाहनांवरील शुल्क २७.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आलंय.
हा दर या महिन्याच्या अखेरीपासून लागू होणार असून त्याचा लाभ वार्षिक १ लाख वाहनांच्या कोट्यावर मिळणार आहे. त्याचबरोबर इतर उत्पादनांची यादीही तयार केली जात आहे, जी सध्याच्या २५% शुल्काशिवाय अमेरिकेत निर्यात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, अमेरिकेत आकारण्यात येणाऱ्या २.५ टक्के आयात शुल्कापेक्षा हा नवा दर अजूनही अधिक असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. अशा परिस्थितीत जेएलआरला संपूर्ण खर्चात सवलत मिळणार नाही.
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
गुंतवणूकदारांनी काय करावं?
जागतिक ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅनलीनं ७१५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवर 'इक्वल वेट' रेटिंग कायम ठेवलं आहे. हे शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा केवळ ४.१% अधिक आहे. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, मागील घसरणीच्या तुलनेत यंदा जेएलआर मजबूत स्थितीत आहे, परंतु नफ्यातील सुधारणा संथ असेल. आर्थिक वर्ष २०२६ साठी कंपनीचे ईपीएस बाजारातील सरासरी अंदाजापेक्षा ८% कमी आहे. तसंच कंपनीच्या फ्री कॅश फ्लोवर (एफसीएफ) लक्ष ठेवणं आवश्यक असणार आहे.
ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा मोटर्सवरील 'अंडरपरफॉर्म'च्या रेटिंगचा पुनरुच्चार करत टार्गेट प्राइस ६०० रुपयांपर्यंत कमी केली आहे. ब्रोकरेज कंपनीनं आर्थिक वर्ष २०२६-२८ साठी ईपीएस अंदाजात १२-१९% कपात केली आहे. जेएलआरचं मार्जिन ६ ते ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. भारतातील व्यावसायिक वाहनांची मंदावलेली मागणी, इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमधील वाढती स्पर्धा आणि जेएलआरचे जुने फ्लॅगशिप मॉडेल्स (रेंज रोव्हर, डिफेंडर इ.) ही चिंतेची कारणं असल्याचं जेफ्रीजचं मत आहे.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं 'रिड्यूस' कॉल दिला आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचे ईबीआयटी मार्जिन आर्थिक वर्ष २०२५ मधील ८.५ टक्क्यांवरून ५-७ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतं. अमेरिकेचे शुल्क, चीनमधील कमकुवत मागणी आणि ब्रँड बिल्डींगवरील वाढता खर्च यामुळे हे घडलं आहे. परिणामी, कंपनीचा फ्री कॅश फ्लो देखील आर्थिक वर्ष २०२५ मधील १.५ अब्ज पौंडवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये शून्याच्या जवळ येऊ शकतो.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्याची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)